Vision

आमचं स्वप्न

समतोल, समान आणि सर्वांगीण अशा विकासावरच महाराष्ट्र शासनाचा भर आहे. असा विकास करण्यासाठी भक्कम पायाभूत सुविधांची पूरक व्यवस्था लागते, ज्यामुळे उद्योगशील कार्यसंस्कृती तर उदयाला येतेच पण त्याबरोबरच अधिक गुंतवणूकही होते आणि नवनिर्मितीला योग्य असं वातावरण संपूर्ण राज्यभर तयार होतं. हे व्हावं याच उद्देशाने “महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची” आखणी केली जात आहे.

या प्रकल्पांतर्गत ज्या पायाभूत सुविधा उभारल्या जातील त्यामुळे राज्याच्या ग्रामीण भागांमध्ये आर्थिक विकासाची एक गतीमान प्रक्रिया सुरू होईल. या मध्ये, सुरक्षित आणि वेगवान वाहतुकीसाठी नागपूर - मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग असणार आहे आणि त्याचबरोबर, आधुनिक सोयीसुविधांनी सजलेली कृषी समृद्धी केंद्रं (नव-नगरे) काही महत्त्वाच्या ठिकाणी असणार आहेत.

हा महामार्ग राज्यातील विविध विभागांना एकमेकांशी तर जोडेलच आणि त्याचबरोबर मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जे.एन.पी.टी) आणि नागपूर येथील मल्टिमोडल इंटरनॅशनल हब एअरपोर्ट (मिहान) यांनाही जोडेल. ज्याच्या माध्यमातून राज्याचा व्यापार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेलाही सामोरा जाईल. या महामार्गावर जी कृषी समृद्धी केंद्रं वसवण्याचा प्रस्ताव आहे ती व्यावसायिकांना आणि उद्योजकांना उत्पादन, व्यापार आणि विक्रीची साधनं दिल्यामुळे विकासाची केंद्र म्हणून ओळखली जातील. या कृषी समृद्धी केंद्रांत शेतीवर आधारित उद्योग, व्यवसाय आणि निवासी क्षेत्र असेल ज्यामुळे हे ठिकाण आसपासच्या भागांमध्ये व्यवसाय आणि आर्थिक व्यवहारांसाठीचं एक प्रभावी केंद्र बनेल.

अशा प्रकारचे भव्य पायाभूत प्रकल्प उभारताना नेहमीच मूळ जमीन मालकांना त्यांची जमीन प्रकल्पासाठी द्यावी लागते. याच प्रकारचे प्रकल्प आजपर्यंत ज्यापद्धतीने राबवले जात होते, त्यामध्ये महाराष्ट्र शासनाला काही मूलभूत आणि अमूलाग्र बदल करण्याची इच्छा आहे. त्यानुसार या मध्ये महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळासोबत स्वेच्छेने सहभागी होतील अशा जमीन मालकांसाठी महामंडळ विकासकाची भूमिका बजावेल. यात एक सूत्र ठरवलं जाईल ज्यामुळे जमीनमालकांचा या कृषी समृद्धी केंद्रांत दिलेल्या पर्यायी विकसित जमिनीवरील हक्क अबाधित राहील.

हे सर्व करता यावं यासाठी भूसंचयनाची एक अभिनव संकल्पना शासनाने पुढे आणली आहे. या योजनेनुसार जमीन मालकांना विकसित क्षेत्रात जमीन मिळेल आणि जमीन गेल्यामुळे त्यांच्या उपजीविकेवर जो परिणाम झाला आहे त्यासाठी १० वर्षांपर्यंत त्यांना भरपाई दिली जाईल.

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभरामध्येही एक अद्वितीय प्रकल्प म्हणून ओळखला जाईल हे नक्की.

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकीच्या आधारे राज्यातल्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणार आहे.

प्रकल्पाविषयी

संपर्कासाठी

 • महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित
  नेपिअन सी रोड, प्रियदर्शिनी पार्क,
  मुंबई ४०० ०३६, महाराष्ट्र.
 • ९१ २२ २३६८५९०९,
  ९१ २२ २६५१७९००,
  फॅक्स : ९१ २२ २६४१७८९३.
 • info@msrdc.org