Message from Hon. Chief Minister

मा. मुख्यमंत्र्यांचा संदेश

देशातलं सर्वात प्रगत राज्य असलेल्या महाराष्ट्रानं आजपर्यंत देशाचं नेतृत्व केलं आहे. मात्र तरीही हे मान्य केलं पाहिजे की राज्याचा विकास सगळीकडे सारखा झालेला नाही. त्यामुळे राज्यात एक प्रकारचा प्रादेशिक असमतोल तयार झाला आहे. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री या नात्यानं या असमतोलाकडे मी एक आव्हान म्हणून पाहतो. म्हणूनच माझ्या कार्यकाळात या परिस्थितीत बदल करण्याची माझी इच्छा आहे.

राज्याचा मुख्यमंत्री झाल्यावर मी आणि माझं शासन हा असमतोल घालवण्यासाठी काय करू शकू? त्यासाठी सरकारची काय भूमिका असावी? यावर मी खूप विचार केला आणि माझ्या लक्षात आलं की -

राज्यातील नागरिकांना स्वबळावर आपली प्रगती करता यावी यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करणं हेच शासनाचं महत्त्वाचं काम आहे.

आणि, या विचारातून महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची संकल्पना पुढे आली.

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा प्रकल्प वेगवान वाहतुकीबरोबरच सर्व आधुनिक सुखसोयी असलेली कृषी समृद्धी केंद्रही (नव-नगरं) निर्माण करणार आहे. हा महामार्ग या कृषी समृद्धी केंद्रांना एकमेकांशी तर जोडेलच, शिवाय महाराष्ट्राचा दुर्गम भाग मुंबई बंदराशी, म्हणजेच जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टशीही जोडेल. यातील कृषी समृद्धी केंद्रं कौशल्य विकासाची, व्यापार-उदिमाची केंद्र बनतील आणि महामार्ग आरेखनातील भागात स्वयंरोजगार, रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग म्हणजे एक सुवर्णसंधी आहे. तुम्ही जर जमीन धारक असाल तर तुमची अमूल्य जमीन या प्रकल्पात गुंतवून तुमच्या कुटुंबाला, गावाला आणि राज्याला तुम्ही प्रगतिपथावर नेऊ शकाल. तुम्ही जर उद्योजक असाल तर ही नामी संधी आहे - तुमचा व्यवसाय अधिक उंचीवर नेण्याची आणि तुम्ही जर गुंतवणूकदार असाल तर हा प्रकल्प सुलभ गुंतवणूकीच्या अनेकानेक संधी तुमच्या समोर ठेवेल.

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा प्रकल्प महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीला एक नवा आयाम देईल याविषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही.

एखादा प्रकल्प उत्तमपणे राबवण्यासाठी प्रत्येक शासनाला गरज असते ती नागरिकांच्या सक्रीय सहभागाची. तुमचं सहकार्य आणि तुमचा सहभाग या प्रकल्पाला खरं यश देईल यावर माझा नितांत विश्वास आहे.

चला, हे स्वप्न साकारण्यासाठी एकमेकांच्या बरोबरीने काम करूया.

देवेंद्र फडणवीस,

मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकीच्या आधारे राज्यातल्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणार आहे.

प्रकल्पाविषयी

संपर्कासाठी

 • महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित
  नेपिअन सी रोड, प्रियदर्शिनी पार्क,
  मुंबई ४०० ०३६, महाराष्ट्र.
 • ९१ २२ २३६८५९०९,
  ९१ २२ २६५१७९००,
  फॅक्स : ९१ २२ २६४१७८९३.
 • info@msrdc.org