Krushi Samruddhi Kendra

कृषी समृद्धी केंद्र

 

 

 

 

 

कृषी समृद्धी केंद्र

नियोजन नसलं की रस्त्यांच्या आजूबाजूला बेसुमार वाढ होते आणि नंतर ही अनियोजित वाढ नियंत्रित करता येत नाही. हे टाळण्यासाठी नागपूर-मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गावर आणि मुख्यत: महत्वाच्या ठिकाणी कृषी समृद्धी केंद्र (नव-नगरे) अतिशय नियोजित पद्धतीनं विकसित करावीत अशी योजना आहे.

१० जिल्ह्यांमध्ये मिळून २० पेक्षा अधिक कृषी समृद्धी केंद्रं प्रस्तावित आहेत. या द्रुतगती मार्गास जिथे इतर राज्य किंवा राष्ट्रीय महामार्ग छेदतील तिथे ही कृषी समृद्धी केंद्रं विकसित केली जाणार आहेत. अशा दोन नगरांमधलं सरासरी अंतर ३० कि.मी. असणार आहे. प्रत्येक नगराचा आकार साधारण १००० ते १२०० एकर [४०० ते ५०० हेक्टर (२ कि.मी. x २.५ कि.मी.)] इतका असणार आहे. केंद्रामध्ये शेतीवर आधारित अन्न व फळ प्रक्रिया उद्योगाला प्राधान्य असेल आणि त्याशिवाय तिथे अन्य उत्पादन आणि व्यापार केंद्रही असेल. याबरोबरच इथे सर्व मूलभूत सोयीसुविधांसकट रहिवासी क्षेत्र देखील असेल. आधुनिक नगररचनेच्या नियमांनुसार इथले जमीन वापराचे प्रमाण ठरविले जाईल. जमिनीचा अर्धा भाग हा निवासी क्षेत्रासाठी राखीव असेल, १५% भाग हा औद्योगिक क्षेत्रासाठी राखीव असेल, तर २०% भाग हा अंतर्गत रस्त्यांसाठी राखीव असेल. याबरोबरच १०% भाग हरितक्षेत्र म्हणून राखीव ठेवला जाईल आणि ५% भाग हा सार्वजनिक आणि त्यासारख्या वापरासाठी ठेवलेला असेल.

प्रत्येक नगराची रचना ही त्या त्या परिसराच्या वैशिष्टयांनुसार केलेली असेल, जेणेकरून ते नगर त्या परिसराची ओळख जपेल आणि वाढवेलही. त्यामुळेच इथल्या प्रत्येक नगराची स्वतःची वेगळी अशी ओळख असेल जी स्थानिक गरजा व भौगोलिक परिस्थितीनुसार बनलेल्या असेल.

प्रत्येक कृषी समृद्धी केंद्र, त्या त्या भागात व्यापार आणि गुंतवणुकीच्या नव्या संधी निर्माण करेल. यामुळे विकासाला चालना मिळेल आणि विविध प्रकारच्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या संधी निर्माण झाल्यामुळे स्थानिकांना कौशल्य विकासाची संधी मिळेल. यामुळे नोकरी आणि व्यवसायाच्या विविध संधी निर्माण होतील व ग्रामीण भागातून शहरी भागाकडे होणारे स्थलांतर थांबवता येईल.

म्हणूनच, ही केंद्रे जवळच्या गावांचा आणि नगरांचा समावेश करून घेऊन विस्तृत प्रादेशिक बाजारपेठा म्हणून विकसित होतील आणि वाढतील व नोकरी आणि व्यवसायासाठी नवनव्या संधी निर्माण करतील.

प्रत्येक कृषी समृद्धी केंद्रांच्या स्थानिक रस्त्यांच्या जाळ्यातही सुधारणा होईल. नगरे ही एकमेकांशी आणि या महामार्गाशी जोडली जातील. आजूबाजूच्या भागांमधून या महामार्गापर्यंत पोहचण्यासाठी जोड रस्ते बांधण्यात येतील आणि मुख्य रस्ते देखील सुधारण्यात येतील. विकास आणि प्रगती ही केवळ या केंद्रांपर्यंत मर्यादित न राहता, ती आजूबाजूच्या भागांतही पोहचेल.

या प्रकल्पाचे लाभ हे १० जिल्ह्यांपुरते मर्यादित न राहता ते लगतच्या १४ जिल्ह्यांपर्यंतही पोचतील आणि नियोजनबद्ध विकासाद्वारे उपलब्ध झालेल्या विविध संधींमुळे तिथल्या एकंदर जीवनमानात सकारात्मक बदल घडू शकेल.

प्रस्तावित कृषी समृद्धी केंद्रांची वैशिष्ट्ये

प्रत्येक कृषी समृद्धी केंद्रांमध्ये या सर्व किंवा यातील अनेक बाबी असतील -

01 प्रत्येक केंद्राचा विस्तार साधारण १००० एकराच्या परिसरात.

02 महामार्गाच्या शेजारीच असल्यामुळे महत्त्वाच्या जिल्ह्यांना जोडलेले.

03 मुख्य रस्त्यांपासून सहज पोहचण्याजोगे.

04 सुसज्ज सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेले.

05 अतिजलद इंटरनेट सुविधा असलेले.

06 लोकांना अनेक सोयीसुविधा देणारे.

07 चांगल्या शाळा, आयटीआय, आरोग्यासाठी सोयीसुविधा, व्यावसायिक केंद्रे, कृषी मदत केंद्रे, कौशल्य विकास केंद्रे आणि तंत्रशिक्षण व उच्च शिक्षण देणार्‍या संस्था असणारे.

08 अखंड वीज पुरवठा व्हावा यासाठी वीजकेंद्र असेल.

09 कृषी प्रक्रिया उद्योग आणि शेतीमाल साठवून ठेवण्यासाठी त्यावर आधारलेल्या सेवा जसे शीतगृहे, गोदामे, कोठारे.

10 हॉटेल्स, विश्राम गृहे, अतिथीगृहे आणि पेट्रोल पंप.

11 खेळांची मैदाने, मोकळ्या जागा, उद्याने, क्रीडा संकुल.

12 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे.

13 तपासणी केंद्र, रुग्णालये आणि मल्टी स्पेशालिटी रुग्णालये इत्यादी आरोग्यसेवा.

14 मॉल्स, खरेदीची ठिकाणे, फूड कोर्ट्स आणि बाजारपेठा अशा गोष्टींनी युक्त.

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकीच्या आधारे राज्यातल्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणार आहे.

प्रकल्पाविषयी

संपर्कासाठी

 • महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित
  नेपिअन सी रोड, प्रियदर्शिनी पार्क,
  मुंबई ४०० ०३६, महाराष्ट्र.
 • ९१ २२ २३६८५९०९,
  ९१ २२ २६५१७९००,
  फॅक्स : ९१ २२ २६४१७८९३.
 • info@msrdc.org