The Concept

संकल्पना

महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था ही देशातल्या इतर राज्यांच्या तुलनेत एक मोठी अर्थव्यवस्था आहे. उदाहरणार्थ सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात राज्याचा विकासदर खूप चांगला म्हणजे १२% होता. राज्याच्या सुमारे ३०% भागात होत असलेली परदेशी गुंतवणूक, उपलब्ध असलेलं कुशल मनुष्यबळ आणि राज्यात असलेली प्रयोगशीलता यामुळे हा विकास-दर साधता आला. राज्याच्या उरलेल्या ७०% भागातही विकासाची क्षमता आहे, पण ती अजून पूर्णपणे उपयोगात येऊ शकलेली नाही.

दळणवळणाच्या अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण झाल्या तरच तिथे तशी क्षमता निर्माण होऊ शकते. या महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची कल्पनाच अशी आहे की यात रस्ते आणि पायाभूत सुविधांचं एक जाळं राज्याच्या १० जिल्ह्यात उभं रहाणार आहे आणि त्यांना लागून असलेले १४ जिल्हे हे वेगवान रस्त्यांनी जोडले जाणार आहेत, जेणेकरून विकासाची प्रक्रिया तिथेही सुरू होईल. या बरोबरच या महामार्गाच्या सभोवती काही नव-शहरे, म्हणजेच कृषी समृद्धी केंद्रंही विकसित करण्याचं नियोजन आहे.

 

महाराष्ट्र समृद्धी महामार्गात खालील गोष्टी अंतर्भूत आहेत

मुंबई बंदर म्हणजेच जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि नागपूरचं मिहान यांना जोडणारा व १० जिल्ह्यातून जाणारा नागपूर-मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती मार्ग;

महामार्गाला लागून असलेल्या १४ जिल्ह्यांना या द्रुतगती मार्गाशी जोडणारं जोडरस्त्यांचं जाळं; आणि

सर्व आधुनिक सुखसोयींनी सुसज्ज अशी वीसपेक्षा अधिक कृषी समृद्धी केंद्रं (नव-नगरे) जी प्रत्येक जोडरस्त्यालगत विकसित केली जातील, जिथे शेतीवर आधारित उद्योग तर असतीलच पण त्याला जोडून बळकटी देणारी व्यापार केंद्रंही असतील.

महाराष्ट्र समृद्धी महामार्गाबाबतच्या ठळक गोष्टी

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा संपूर्णपणे नव्यानं उभा राहणारा आहे (Greenfield project).

नागपूर आणि मुंबईमधील अंतर, प्रवासी वाहतुकीला ८ तासात व मालवाहतुकीला १६ तासात पार करता येईल.

या महामार्गामुळे महाराष्ट्र राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी २४ जिल्हे एकमेकांना जोडले जातील.

हा शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग राज्याच्या सहा महसूल विभागांपैकी पाच विभागात असलेल्या दहा जिल्ह्यांतील सव्वीस तालुक्यांमधील ३९२ गावांमधून जाणार आहे.

यामुळे महाराष्ट्रातील दूरवरचे जिल्हे मुंबईतील बंदराशी आणि जिथून नागपूरच्या हवाई मार्गानं जगात कुठेही मालवाहतुक होईल अशा मिहानशी जोडले जाणार आहेत.

यासाठी लागणारी जमीन एका विशिष्ट पद्धतीची योजना राबवून जमीन धारकांकडून एकत्र केली जाणार आहे, जिथे जमीनमालक या सर्व योजनेचे भागीदार होतील. याच योजनेअंतर्गत प्रस्तावित कृषी समृद्धी केंद्रांचा, म्हणजेच नव-नगरांचाही विकास होणार आहे.

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा प्रकल्प देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीच्या आधारे राज्यातल्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा ठरणार आहे.

महाराष्ट्र शासनाने घेतलेले प्रमुख निर्णय -

01महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (मरारविम) या प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी संस्था असेल.

02मरारविम या द्रुतगती मार्गावर वसवल्या जाणाऱ्या कृषी समृद्धी केंद्रांच्या विकासासाठी नवनगर विकास प्राधिकरण (New Town Development Authority) म्हणून काम बघेल.

03या प्रस्तावित कृषी समृद्धी केंद्रांमध्ये राज्याच्या विविध विभागांच्या कल्याणकारी योजना एकत्रितरित्या राबवल्या जातील.

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकीच्या आधारे राज्यातल्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणार आहे.

प्रकल्पाविषयी

संपर्कासाठी

 • महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित
  नेपिअन सी रोड, प्रियदर्शिनी पार्क,
  मुंबई ४०० ०३६, महाराष्ट्र.
 • ९१ २२ २३६८५९०९,
  ९१ २२ २६५१७९००,
  फॅक्स : ९१ २२ २६४१७८९३.
 • info@msrdc.org