Benefits

महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे फायदे काय?

नियोजित महाराष्ट्र समृद्धी महामार्ग महाराष्ट्राला दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर आणि वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरशी जोडणारा महत्त्वाचा दुवा असेल. महाराष्ट्रातला काही भाग या महामार्गाला तर थेट जोडला जाईलच पण त्याशिवाय तो भाग जेएनपीटी या देशातल्या सर्वात मोठ्या व्यापारी बंदराशीही जोडला जाईल. यामुळे राज्याच्या आयात आणि निर्यात क्षमतेत वाढ होईल.

हा महामार्ग आणि त्यासाठी बांधलेले जोडरस्ते यामुळे राज्यातली बरीच प्रेक्षणीय स्थळं एकमेकांना जोडली जातील. याचा सकारात्मक परिणाम राज्यातील पर्यटन क्षेत्रावर होईल. हा महामार्ग राज्यातील अविकसित आणि विकासाच्या प्रक्रियेपासून खूप लांब असलेल्या भागात नवनव्या आर्थिक व सामाजिक विकासाच्या संधी निर्माण करेल. या महामार्गाला लागून जी नवनगरे किंवा कृषी समृद्धी केंद्रं वसवली जाणार आहेत, तेथील विविध प्रकारच्या शेतीवर आधारित उद्योगामुळे त्या भागात कृषी क्षेत्रातील रोजगार आणि स्वयं-रोजगाराची संधी निर्माण होईल. यामुळे राज्याच्या ग्रामीण भागांमध्ये केवळ शेतीवर आधारित उद्योगच नव्हे तर अन्य क्षेत्रातही रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि यामुळे राज्यातील बेरोजगारी, गरिबी व विषमता कमी होण्यास मदत होईल.

प्रत्येक कृषी समृद्धी केंद्रामध्ये साधारणपणे वीस ते पंचवीस हजार रोजगाराची निर्मिती होईल अशी अपेक्षा आहे.

जमीन मालकांसाठी काय?

जे जमीनमालक आपली जमीन स्वयंस्फूर्तपणे एकत्रीकरण (लँड पूलिंग) योजनेमध्ये देतील त्यांना त्यांची जमीन जर कृषी समृद्धी केंद्रासाठी उपयोगात आणली जाणार असेल तर त्यांनी दिलेल्या जमिनीच्या ३०% इतकी जमीन नव्यानं विकसित होत असलेल्या क्षेत्रात त्यांना दिली जाईल. त्यांनी जमीन रस्त्यासाठी दिली तर त्याचे मोबदल्यात २५% जमीन नव्याने विकास होत असलेल्या क्षेत्रात दिली जाईल. या नव-नगरांमध्ये त्यांना मैदाने, बागा, मोकळ्या जागा, पाणीपुरवठा, रस्ते, वीजपुरवठा इत्यादी सोयीसुविधांचा लाभ मिळेल. आपली उत्पन्न देणारी जमीन दिल्यामुळे जमीनमालकांचं जे आर्थिक नुकसान होईल ते भरून काढण्यासाठी त्यांना जिरायती जमिनीसाठी सलग दहा वर्ष दर वर्षी रु. ३०,००० एकरी दिले जातील. हीच भरपाई हंगामी सिंचन असलेल्या जमिनीसाठी रु. ४५,०००, तर बागायत जमिनीसाठी रु. ६०,००० इतकी असेल. दर वर्षी होत असलेल्या महागाईचा विचार करता ही रक्कम देखील दरवर्षी १०% नी वाढवली जाईल. जमीनमालकाच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासनातर्फे मोफत व्यवसायशिक्षण दिले जाईल. १० वर्षांच्या शेवटी जर जमीनमालकाला ही जमीन अन्य कोणाला विकता आली नाही तर सरकार ही जमीन मूळ कराराच्या किंमतीवर, दरवर्षी ९% इतके व्याज त्यात घालून त्या जमीनमालकाकडून विकत घेईल.

कृषी समृद्धी केंद्रांमुळे जमीनमालकांना अनेक लाभ आणि सुविधा मिळणार आहेत. त्यांना या कृषी समृद्धी केंद्रांमध्ये विविध रोजगाराच्या संधी तर मिळतीलच पण तिथे असलेली कृषी प्रक्रिया केंद्रं, शीतगृहं, गोदामं, भांडारं, गुरांचे दवाखाने इत्यादींचाही लाभ मिळेल. कृषीशी संबंधित व्यवसायांमुळे स्वयंरोजगार व रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

प्रवाशांना काय फायदा?

नागपूर ते मुंबई हे अंतर केवळ ८ तासांमध्ये पार करणं हा प्रवासी वर्गाचा मोठा फायदा. याचाच अर्थ औरंगाबाद ते मुंबई हे अंतर ४ तासांमध्ये तर नागपूर ते औरंगाबाद हे अंतरही फक्त ४ तासांमध्ये पार करता येईल. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यांमुळे इंधनाची आणि वाहनाच्या देखभाल खर्चाची बचत होईल. हा महामार्ग अपघात रोखेल तसेच सुरक्षित आणि तरीही वेगवान वाहतूक चालू ठेवेल. या महामार्गाच्या कडेने झाडे लावली जाणार आहेत, यामुळे प्रदूषण कमी होईल. प्रवाशांना प्रेक्षणीय स्थळांपर्यंत लवकर पोचता येईल. वाय-फाय बरोबरच आणखी अनेक प्रवासी सुविधा या महामार्गावर असल्याने प्रवास अधिक सुखकर होईल.

उद्योग-व्यावसायिकांना काय फायदा?

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग विविध कृषी आणि औद्योगिक केंद्रांना नागपूर आणि मुंबईच्या बाजारपेठांशी जोडेल. या नव्या कृषी समृद्धी केंद्रांमध्ये व्यावसायिकांना उत्तम प्रतीची राहण्याची सोय असेल, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी सुविधा असतील आणि गुंतवणूकदारांशी त्यांचा सहज संपर्क होऊ शकेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे कुशल आणि अकुशल असं दोन्ही प्रकारचं मनुष्यबळ सहज उपलब्ध होऊ शकेल.

आसपासच्या जिल्ह्यांना काय फायदा?

हा प्रकल्प उभा राहताना, आणि उभा राहिल्यावर इथे प्रत्यक्ष रोजगारनिर्मिती तर होईलच पण त्याचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणावर अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीही होईल. कृषी समृद्धी केंद्रांमुळे विविध प्रकारच्या संधी निर्माण होतील आणि सर्वांगीण विकासाला चालना मिळेल. यामुळे जिल्हा तसेच त्या आसपासच्या ग्रामीण भागाकडून रोजगारासाठी शहराकडे होणारे स्थलांतर थांबेल.

हा महामार्ग ज्या १० जिल्ह्यांतून जाणार आहे ते जिल्हे व अन्य १४ जिल्हे दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर, वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर आणि जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टशी जोडले जातील. त्याचा व्यापार, उद्योगावर सकारात्मक परिणाम होईल. यामुळे जलदगतीने विविध प्रकारच्या वस्तू, कृषी उत्पादने, दुग्धजन्य पदार्थ बाजारपेठेपर्यंत पोहचू शकतील. वस्तूंबरोबरच लोकांचा देशांतर्गत बाजारपेठा तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी थेट संबंध प्रस्थापित होतील. यामुळे या १० जिल्ह्यांच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल व चांगल्या पद्धतीच्या रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधींची निर्मिती होऊन स्थानिक दरडोई उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल.

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकीच्या आधारे राज्यातल्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणार आहे.

प्रकल्पाविषयी

संपर्कासाठी

 • महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित
  नेपिअन सी रोड, प्रियदर्शिनी पार्क,
  मुंबई ४०० ०३६, महाराष्ट्र.
 • ९१ २२ २३६८५९०९,
  ९१ २२ २६५१७९००,
  फॅक्स : ९१ २२ २६४१७८९३.
 • info@msrdc.org