समृद्ध लाभार्थ्यांची गोष्ट : वाशिम भाग १

१० जिल्ह्यातील जमीन धारकांनी महामंडळासोबत सरळ खरेदी व्यवहार केला. आर.टी. जी. एस द्वारे पैसे बँकेतील खात्यात जमा झाल्यानंतर तो पैसा त्यांनी कुठे व कसा वापरला हे सांगणारी वाशिममधील अशाच काही समृद्ध लाभार्थ्यांची गोष्ट दोन भागात.
त्यातील हा पहिला भाग..

वाशिममधील कारंजा तालुक्यातील इमामपूरमधील वकील गारवे, धानोरा ताथोड गावातील विश्वनाथ ताथोड आणि मालेगाव तालुक्यातील इराळा गावातील माणिकराव ठाकरे समृद्धीप्रकल्पातील अनेक लाभार्थ्यांपैकी काही भूधारक लाभार्थी! या तीनही भूधारक लाभार्थ्यांची गोष्ट जेवढी प्रेरणादायक आहे तेवढीच ती आपल्यातल्या प्रत्येकाला काही ना काही शिकवून जाणारी आहे.

वकील गारवे यांची इमामपूर गावात एकूण साडेसात एकर शेती होती. गहू, हरभरा, कापूस आणि सोयाबीन ही मुख्य पिके गारवे कुटुंबीय घेत. घरात स्वतः वकीलजी, त्यांची पत्नी, मुलगा आणि वडील असे चारच जण राहतात. शेतीतून मिळणारे उत्पन्नही चांगले, म्हणजे वार्षिक पाच लाख रुपये! महाराष्ट्र समृद्धी महामार्गासंदर्भात गावात चर्चा सुरू झाल्यानंतर साहजिकच प्रथमतः प्रकल्पाला विरोध झाला. वकील गारवे यांची सुमारे चार एकर जमीन प्रकल्पाच्या उपयोगात येणार होती. मात्र महामंडळ प्रकल्पाच्या उपयोगात येणाऱ्या जमिनीचा व्यवहार करून आपल्याला चांगला मोबदला देत आहे हे लक्षात आल्यावर त्यांचा विरोध मावळला. जवळच नवी जमीन घेऊन शेतीस सुरुवात करण्याचा त्यांनी निश्चय केला. बग्गी गावातील पाच एकर पडीक जमीन त्यांनी खरेदी केली. तेथे विहीर नसल्याने त्यांनी विहीरही खणली. एवढेच नाही तर पडीक जमीन असूनही स्वतःच्या कष्टाने अगदी कमी कालावधीत वकील यांनी पडीक जमिनीवर नंदनवन फुलवण्याची किमया साधून दाखवली. शेतात एका बाजूला कोबी तर दुस-या भागात वांग्याचा वेल त्यांनी लावला आहे. तसेच पिकांना सातत्याने पाणीपुरवठा होईल, यासाठी ठिबक सिंचनही सुरू केले. वकील यांच्या या मेहनतीला नुकतेच फळ आले असून त्यांच्या शेतात आता पिके डोलू लागली आहेत. शेतजमिनीच्या खरेदीतून उरलेल्या पैशांची तजवीजही गारवे कुटुंबियांनी उत्तम पद्धतीने केली आहे. कारंजा शहरातच त्यांनी प्लॉट घेतला असून तिथे घर बांधण्याचा त्यांचा मानस आहे. वकील यांनी एकुलत्या एक मुलाच्या नावानेही काही रक्कम बँकेत मुदत ठेवीच्या रूपात ठेवली आहे. त्याच्या शिक्षणासाठी ही तरतूद केल्याचे वकील सांगतात.

वकील गारवे यांच्याप्रमाणे विश्वनाथ ताथोड हे वाशिम मधील आणखी एक लाभार्थी ! विश्वनाथ ताथोड यांना दोन मुलगे. मोठा मुलगा भुवनेश्वर ताथोड शेतीत लक्ष घालतो. तर धाकटा मुलगा पटवारीचे काम करतो. ताथोडांची एकूण ६२ एकर शेती आहे. १०० टक्के कोरडवाहू असलेली ही शेती पूर्णपणे धरणावर अवलंबून असे. पावसाने धरण भरले तर ठीक, नाही तर शेत कोरडे राहणार. शेतात विहीर होती. परंतू तिला बारमाही पाणी नाहीच. तीही धरणातील पाण्यावर अवलंबून. त्यामुळे ६२ एकर शेतीत ताथोड कुटुंबियांना पावसाच्या मर्जीप्रमाणे पिके घ्यावी लागत. गहू, हरभरा, सोयाबीन आणि तूर ही मुख्य पिके, ते घेत. गेल्या दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस न झाल्याने त्यांची शेती तशी फुललीच नाही. तुरीचे पीक येते, कारण तुरीला फार पाणी लागत नाही. त्यामुळे जमिनीत जेवढा ओलावा असेल, तेवढ्यावर तूर येते. त्यातूनच जेवढे उत्पन्न मिळेल त्यावर ताथोड कुटुंबियांना समाधान मानावे लागे. एकूणच शेती मोठी असूनही मिळणारे उत्पन्न अस्थिर असल्याने ताथोड कुटुंबियांच्या हाती फारसे काही राहात नसे. समृद्धी महामार्गात ताथोड कुटुंबाची पावणेचार एकर जमीन गेली.

ताथोड यांनी मिळालेला पैसा थेट सहकारी बँकेत मुदत ठेवीच्या (एफडी) रुपाने ठेवून दिला आहे. त्याचे दरमहा व्याज मिळते. त्यातून घरखर्च भागतो. वडील आता शेतीत फारसे लक्ष घालत नाहीत. त्यामुळे शेतात जाणे, तेथील कामे पाहणे, मजुरी, पिके यांकडे भुवनेश्वर ताथोडच लक्ष देतात. यापूर्वी दोनदा गाव विस्थापित झाल्याने ताथोडांची बरीच जमीन यापूर्वीही प्रकल्पात गेलेली. त्यामुळे कुठल्याही प्रकल्पाविषयीचे त्यांचे मत विशेष बरे नव्हते मात्र, समृद्धी महामार्ग प्रकल्पात जमीन गेल्याचे त्यांना समाधान वाटते. कारण त्यातून मिळालेल्या मोबदल्यातून त्यांचा घरखर्चावरील भार कमी झाला आहे!

वकील आणि विश्वनाथ यांच्याप्रमाणेच इराळा गावातील माणिकराव ठाकरे आम्हाला समृद्धीच पावली या शब्दात आपले समाधान व्यक्त करतात. त्यांची गावात एकूण १२ एकर शेती होती. त्यापैकी सात एकर जमीन समृद्धी महामार्गासाठी खरेदी झाली आहे. कापूस, ज्वारी, सोयाबीन आणि तूर ही पिके ते घेत. कोरडवाहू शेती असल्याने पाण्याची नेहमीच वानवा असे. त्यातही जमिनीचा पोत इतर गावांपेक्षा कमी दर्जाचा असल्याने म्हणावी तशी शेती होत नसे. घरात त्यांच्यासह पत्नी, मुलगा, सून आणि दोन नातवंडे असा परिवार आहे. माणिकरावांना एक मुलगीही आहे. शेतीचा घसरलेला दर्जा आणि जमिनीचा बिघडलेला पोत, यामुळे नाही तरी मेटाकुटीलाच आला होता जीव. त्यामुळे समृद्धी महामार्गात जमीन जाते आहे म्हटल्यावर विरोध करावासा वाटला नाही, असे माणिकराव प्रामाणिकपणे नमूद करतात. शेती विकण्याचा विचार सुरूच होता. काही कौटुंबिक कारणांमुळे पैशांची गरज होतीच. त्यामुळे समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीच्या बदल्यात मिळालेला मोबदला कैकपटींनी सुखावह आहे, असे माणिकरावांनी स्पष्ट केले. माणिकरावांनी आम्ही यथावकाश शेतजमीन पाहू, तिचा दर्जा, जमिनीचा पोत पाहून मग निर्णय घेऊ आणि घरात विचारविनिमय करून मगच शेती घ्यायची की नाही, याबाबत निर्णय घेऊ असे स्पष्ट केले. उरलेल्या पाच एकर जमिनीत आम्ही पारंपरिक शेतीच करणार आहोत, असेही माणिकराव सांगतात.

वाशिमप्रमाणे इतर जिल्ह्यातील हजारो लाभार्थीही या प्रकल्पाच्या माध्यमातून आता भावी आयुष्याची सोनेरी स्वप्नपाहत आहेत. वाशिममधील लाभार्थ्यांच्या गोष्टी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://www.youtube.com/watch?v=2X-8w28TZp4 https://www.youtube.com/watch?v=KRL_PQKub3g&t=92s

Maharashtra Samruddhi Mahamarg

Maharashtra Samruddhi Mahamarg aims at providing an impetus to the overall development of rural areas by attracting domestic and foreign investments.

About Project

Get in touch

 • Maharashtra State Road Development Corporation Ltd
  Napean Sea Road, Priyadarshini Park,
  Mumbai 400 036, Maharashtra, India.
 • 91 22 23685909,
  91 22 26517900,
  Fax: 91 22 26417893.
 • info@msrdc.org