समृद्ध लाभार्थ्यांची गोष्ट : बुलडाणा भाग १

१० जिल्ह्यातील जमीन धारकांनी महामंडळासोबत सरळ खरेदी व्यवहार केला.आर.टी.जी.एस द्वारे पैसे बँकेतील खात्यात जमा झाल्यानंतर तो पैसा त्यांनी कुठे व कसा वापरला हे सांगणारी बुलडाण्यामधील अशाच काही समृद्ध लाभार्थ्यांची गोष्ट दोन भागात..त्यातील हा पहिला भाग..

बुलडाण्याच्या मेहकर तालुक्यातील  चायगाव मधील जितेश देशमुख  आणि फर्दापूर गावातील बल्लू बोडखे समृद्धी प्रकल्पातील अनेक लाभार्थ्यांपैकी दोन भूधारक लाभार्थी!

जितेश देशमुख यांची चायगावात एकूण बारा एकर शेती होती.  त्यांच्या कुटुंबात त्यांची आई, आजी आणि लहान भाऊ असे चौघेजण आहेत. चार वर्षांपूर्वी जितेशच्या वडिलांचे अपघाती निधन झाले. त्यामुळे घराची संपूर्ण जबाबदारी जितेश यांच्यावर येऊन पडली. वडील होते तोपर्यंत शिक्षणामुळे शेतीकडे त्यांनी फारसे लक्ष दिले नाही. मात्र, वडिलांनंतर शेतीकडे तेच लक्ष देत होते आणि सोबत नोकरीही करत होते.  खरिपात सोयाबीनचे पीक तर रब्बीत हरभरा घेऊन वर्षाकाठी त्यांना चांगले उत्पन्न मिळत होते. 

सर्व व्यवस्थित चाललेले असतानाच आपल्या शेतशिवारातून, समृद्धी नावाचा मोठा महामार्ग जाणार असल्याचे जितेशच्या कानावर आले. ज्यांच्या शेतातून हा महामार्ग जाणार होता ते या प्रकल्पाला विरोध करू लागले. त्यात जितेशचाही समावेश होता. मात्र, शासकीय अधिकारी आणि संवादक यांच्याकडून प्रकल्पाविषयी परिपूर्ण माहिती मिळाल्यानंतर जितेशचा विरोध मावळू लागला. यथावकाश त्याच्या शेताची मोजणी झाली आणि खरेदी करारही तयार झाला. १२ एकरपैकी प्रकल्पाच्या उपयोगात येणाऱ्या जितेशच्या ४.५ एकर जमिनीचे त्याच्या कुटुंबाला चांगले आणि योग्य पैसे मिळाले. मिळालेल्या मोबदल्यातील काही भाग नवी आणि पूर्वीपेक्षा मोठी जमीन घेण्यासाठी गुंतवायचे जितेशने निश्चित केले आणि त्यानुसार नवी आठ एकर जमीन जितेशने विकत घेतली.  या शेतात आपल्याला आधुनिक पद्धतीने शेती करायची असल्याचे तो आवर्जून सांगतो.  शेड नेट पद्धतीने भाजीपाला पिकवायचा असून दुधाचा व्यवसाय करण्याचाही जीतेशचा मानस आहे. जितेशचा लहान भाऊ सध्या शिकतो आहे. त्याच्या शिक्षणासाठीही काही पैसा त्याने राखून ठेवला आहे. आईच्या आरोग्यासाठी जीवन विमा पॉलिसीही त्याने काढली आहे. तसेच काही पैसे त्याने बँकेत मुदत ठेवीच्या रुपात ठेवले आहेत. 


जितेश देशमुख यांच्याप्रमाणेच फर्दापूर गावातील बल्लू बोडखे यांची कहाणी आहे. बल्लू यांची साडेचार एकर शेती आहे. बल्लू यांच्या शेतात ऊस पिकत असे. त्याबरोबरच हरभरा आणि गहू ही पिकेही ते घेत.  शेतीतून मिळणारे उत्पन्न तसे ठीकठाक. परंतु त्याला जोड म्हणून बल्लूजी दुधाचा व्यवसायही करतात.   साडेचार एकरपैकी त्यांची दिड एकर जमीन प्रकल्पाच्या उपयोगात येणार आहे. बल्लू यांनीही सुरुवातीला प्रकल्पाला विरोध केला होता.  परंतु प्रकल्पाबाबत जसजशी माहिती कळू लागली, तसतसा त्यांचा विरोध मावळू लागला. आता तेच बोडखे-पाटील समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे खंदे समर्थक झाले आहेत... त्यांना जमीन व्यवहाराअंती चांगले पैसे मिळाले. समृद्धीच्या पैशांतून त्यांनी नवी तीन एकर शेती घेतली आहे.  शेतीच्या बदल्यात शेतीच घ्यायची हे पैसे येण्याच्या आधीच ठरवले होते असे बल्लू सांगतात.  उरलेल्या पैशांतून घराचे पक्के बांधकाम करण्याचा त्यांचा इरादा आहे. त्यासाठी काही पैसे वाचवून ठेवले असल्याचे ते सांगतात.

बुलडाण्याप्रमाणे इतर जिल्ह्यातील हजारो लाभार्थीही या प्रकल्पाच्या माध्यमातून आता भावी आयुष्याची सोनेरी स्वप्नपाहत आहेत. बुलडाण्यामधील लाभार्थ्यांच्या गोष्टी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://www.youtube.com/watch?v=NjyJNoJSVm4&t=76s https://www.youtube.com/watch?v=dUL4-SwyxiU&t=78s

Maharashtra Samruddhi Mahamarg

Maharashtra Samruddhi Mahamarg aims at providing an impetus to the overall development of rural areas by attracting domestic and foreign investments.

About Project

Get in touch

  • Maharashtra State Road Development Corporation Ltd
    Napean Sea Road, Priyadarshini Park,
    Mumbai 400 036, Maharashtra, India.
  • 91 22 23685909,
    91 22 26517900,
    Fax: 91 22 26417893.
  • info@msrdc.org