समृद्ध लाभार्थ्यांची गोष्ट : औरंगाबाद

१० जिल्ह्यातील जमीन धारकांनी महामंडळासोबत सरळ खरेदी व्यवहार केला. आर.टी. जी.एस द्वारे पैसे बँकेतील खात्यात जमा झाल्यानंतर तो पैसा त्यांनी कुठे व कसा वापरला हे सांगणारी औरंगाबादमधील लाभार्थ्यांची गोष्ट

औरंगाबादमधील गंगापूर तालुक्यातील नांगरे बाभूळगाव येथील लक्ष्मण मांडवगड आणि उल्हासराव पाटील- सोनावणे हे समृद्धी प्रकल्पातील अनेक लाभार्थ्यांपैकी दोन भूधारक लाभार्थी!

उल्हासरावांकडे एकूण साडेदहा एकर शेती आहे. शेतातच घर. तेही अलीकडेच बांधलेले. घरासमोर विहीर, मागे मोसंबीच्या बागा, आंबा, चिंचेची झाडे उल्हासरावांनी निगुतीने वाढवलेली. मात्र या सडे दहा एकर शेतीपैकी सव्वाचार एकर शेती समृद्धी प्रकल्पासाठी खरेदी करण्यात आली आहे. महामार्गात त्यांची जमीन जाणार आहे, हे समजल्यावर उल्हासरावांच्या पायाखालची जमीनच सरकली. परंतू शासकीय अधिकारी आणि संवादक यांनी त्यांना सावरले. संवादकांनी प्रकल्पाविषयी माहिती देण्यास सुरुवात केली आणि उल्हासरावांना मिळणार असलेल्या मोबदल्याविषयी सांगितले तेंव्हा त्यांना हायसे वाटले. समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीचे चांगले पैसे मिळाल्याने सोनावणे कुटुंबियांच्या आनंदाला पारावार उरला नाही. या पैशांतून आपण पुन्हा शेतीच विकत घ्यायची हा निर्धार सोनावणे कुटुंबाने केला. उल्हासरावांनी पांगरे बाभूळगाव शिवाराच पाच एकर तर गावापासून नजीकच आणखी चार एकर अशी एकंदर नऊ एकर जमीन खरेदी केली आहे. आता या शेतात ते विहिरी खणणार आहेत. तसेच फळझाडांची लागवड करून भरघोस पीक घेण्याचा उल्हासरावांचा निर्धार आहे. जलवाहिनीचे कामही त्यांनी हाती घेतले आहे. उल्हासरावांनी समृद्धीच्या पैशांतून ट्रॅक्टरही खरेदी केला. ट्रॅक्टरच्या मदतीने शेती आणखी गतीने करता येणार असल्याचे उल्हासराव म्हणाले. उर्वरित पैसे त्यांनी बँकेत मुदत ठेवीमध्ये ठेवले आहेत. मुलांच्या शिक्षणासाठीही त्यांनी काही पैसा राखून ठेवला आहे. तर मुलीच्या लग्नासाठीही काही तरतूद करून ठेवली आहे. उल्हासरावांची जमीन वडिलोपार्जित असल्याने त्यांना मिळालेल्या मोबदल्यात बहिणींचाही वाटा असावा, या हेतूने ते स्वतः दोन बहिणींना पैसे देणार आहेत. तसेच नवीन घर लासूर गावात घेणार असल्याचे उल्हासरावांनी सांगितले.

लक्ष्मणरावांचीसुद्धा अशीच काहीशी गोष्ट आहे. लक्ष्मण मांडवगड आणि त्यांच्या पत्नीची अशी एकूण मिळून सुमारे पाच एकर शेती धामोरी आणि बाभूळगाव शिवारात आहे. पंचक्रोशीत पावसाचे प्रमाण तसे कमीच. त्यामुळे पाण्याचा ते काळजीपूर्वक वापर करतात. ते शेतात आलं, फळभाज्या वगैरे पिके घेतात. त्यातून त्यांना वार्षिक तीन ते पाच लाखांचे उत्पन्न मिळते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून परिसराकडे पावसाने पाठ फिरवल्याने उत्पन्न निम्म्यावर आल्याचे लक्ष्मणरावांनी सांगितले. उत्पन्नातील तूट भरून काढण्यासाठी ते दुधाचा व्यवसायही करतात. पत्नीच्या नावाने बाभूळगाव शिवारात असलेल्या ७३ आर क्षेत्रापैकी ३८.५ आर शेती समृद्धी महामार्गासाठी खरेदी करण्यात आली आहे. खरेदी झाल्यानंतर त्यांच्या खात्यात पैसे तात्काळ जमा झाले.

बँकेतील मुदत ठेवीच्या योजनेला प्राधान्य देऊन ते मिळालेला मोबदला गुंतवणार आहेत. मुदत ठेवीतून मिळणारे व्याज चांगले असल्याने त्यातून घरखर्च भागवता येतो असेही त्यांनी सांगितले. लक्ष्मणरावांना दोन वर्षांची मुलगी आहे. तिच्या भविष्यासाठी मोबदल्यातील काही भाग बाजूला काढून ठेवण्याचा त्यांचा विचार आहे. या प्रकल्पाच्या निमित्ताने पायाभूत सुविधांचा परिसरात विकास होईल आणि भरभराटही होईल, अशा आशावाद त्यांनी अखेरीस व्यक्त केला. समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीव्यतिरिक्त उरलेल्या जमिनीवर शेती करणे सुरूच ठेवणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

औरंगाबादप्रमाणे इतर जिल्ह्यातील हजारो लाभार्थीही या प्रकल्पाच्या माध्यमातून आता भावी आयुष्याची सोनेरी स्वप्न पाहत आहेत. औरंगाबादमधील लाभार्थ्यांच्या गोष्टी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://www.youtube.com/watch?v=J6V4I03zRFI&t=58s

Maharashtra Samruddhi Mahamarg

Maharashtra Samruddhi Mahamarg aims at providing an impetus to the overall development of rural areas by attracting domestic and foreign investments.

About Project

Get in touch

  • Maharashtra State Road Development Corporation Ltd
    Napean Sea Road, Priyadarshini Park,
    Mumbai 400 036, Maharashtra, India.
  • 91 22 23685909,
    91 22 26517900,
    Fax: 91 22 26417893.
  • info@msrdc.org