समृद्ध लाभार्थ्यांची गोष्ट : अमरावती

१० जिल्ह्यातील जमीन धारकांनी महामंडळासोबत सरळ खरेदी व्यवहार केला. आर.टी. जी.एस द्वारे पैसे बँकेतील खात्यात जमा झाल्यानंतर तो पैसा त्यांनी कुठे व कसा वापरला हे सांगणारी अमरावतीमधील अशाच काही समृद्ध लाभार्थ्यांची गोष्ट..

अमरावतीमधील चांदूर रेल्वे तालुक्यातील निमगव्हाण गावातील अशोक चक्रधरे समृद्धी प्रकल्पातील अनेक लाभार्थ्यांपैकी एक भूधारक लाभार्थी! त्यांची एकूण आठ एकर जमीन होती त्यापैकी एकूण पाच एकर जमीन महामार्गाच्या कामासाठी खरेदी करण्यात आली. तिथे ते गेल्या अनेक वर्षांपासून शेती करत होते. लहान वयातच त्यांची शाळा सुटली होती. शिक्षण सुटल्याने पुढे काय, हा प्रश्न होताच. मग ते शेतात मजुरी करू लागले. मग हळूहळू शेतीची माहिती कळू लागली.

शेती समजू लागली. मजुरी करता करता ते पैसे गाठीला लावत गेले आणि मग २००७ मध्ये हिंमत करून गावाजवळच त्यांनी शेती घेतली. कच्चं घरही बांधले. शेतात सोयाबीन, चणा, गहू, तूर इत्यादी पीक घेऊ लागले. सरकारी योजनेतून विहीर मिळालेली होती. घरात दोघे पती-पत्नी आणि तीन मुले, असा परिवार. शेतीतले एकूण उत्पन्न दोन-अडीच लाख रुपये वार्षिक असे मिळत होते. मुले एकीकडे मोठी होत असल्याने त्यांच्या उच्च शिक्षणालाही पैसे लागणार होते. शेतमजूर ते शेतमालक असा प्रवास झाला तरी उधार उसनवारीही करावी लागत होती. त्यामुळे समृद्धी महामार्गाची कल्पना येताच त्यांनी जमीन देण्याची तयारी दर्शवली. परंतू भाव किती मिळणार हे काही त्यांना समजेना, त्यामुळे त्यांची धाकधूक वाढली होती. मात्र मिळणारा मोबदला समाधानकारक असल्याचे लक्षात आल्यावर ते तयार झाले. अशोकजींनी मिळालेल्या पैशांतून गावापासून जवळच असलेल्या मौजा जावरा शिवारात चार एकर आठ गुंठे जागेत उभी असलेली संत्र्याची बाग विकत घेतली आहे. त्यांच्या नव्या बागेत २०० झाडं उभी आहेत. पैसे मिळाले त्यावेळी संत्र्याची बाग घ्यायची असे काही ठरवले नव्हते परंतु जमीन पसंत पडली आणि व्यवहार केल्याचे ते म्हणाले. संत्रा बागेला लागूनच चार एकर शेत आहे, तेही घेण्याचा विचार असून बोलणी सुरू असल्याचेही ते सांगतात.

अशोक यांचे आधीचे घर अगदीच जुने झाले होते. समृद्धीतून मिळालेल्या पैशांतून नवीन घर बांधण्याचा विचार त्यांनी केला आणि अंमलातही आणला. वडिलांनाही पक्के घर बांधून दिल्याचे त्यांनी सांगितले. समृद्धीचे अनेक लाभार्थी शेतकरी गावात आहेत. त्यामुळे समृद्धीच्या पैशांनी गावात ख-या अर्थाने समृद्धी आल्याचे अशोकजी सांगतात. तसेच समृद्धी महामार्गाच्या निमित्ताने गावालगतच्या शेतजमिनींचा भावही वधारल्याचे निरीक्षण ते मांडतात.

अशोक चक्रधरे यांच्याप्रमाणे अमरावती जिल्ह्यातील प्रमोद पहाडे यांची १ हेक्टर ६७ आर जमीन आणि प्रफुल नखाते यांची ९ एकर जमीन समृद्धी महामार्गाच्या उपयोगात येणार आहे. त्यासाठी त्यांना चांगला मोबदला मिळाला आहे.अमरावतीप्रमाणे इतर जिल्ह्यातील हजारो लाभार्थीही या प्रकल्पाच्या माध्यमातून आता भावी आयुष्याची सोनेरी स्वप्न पाहत आहेत. अमरावतीमधील लाभार्थ्यांच्या गोष्टी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Maharashtra Samruddhi Mahamarg

Maharashtra Samruddhi Mahamarg aims at providing an impetus to the overall development of rural areas by attracting domestic and foreign investments.

About Project

Get in touch

 • Maharashtra State Road Development Corporation Ltd
  Napean Sea Road, Priyadarshini Park,
  Mumbai 400 036, Maharashtra, India.
 • 91 22 23685909,
  91 22 26517900,
  Fax: 91 22 26417893.
 • info@msrdc.org