समृद्धीसाठी रस्ता रुंदीकरण हा पर्याय नव्हे ! भाग ३

समृद्धी महामार्गाची बांधणी करताना जुन्या महामार्गांच्या रुंदीकरणाचा मुद्दा विविध स्तरावर लोकांनी मांडल्यानंतर आपली भूमिका लोकांना समजावी या दृष्टीने 'समृद्धीसाठी रुंदीकरण हा पर्याय नव्हे!' या नावाची एक लेखमालिका आपल्यापर्यंत आम्ही पोचवत आहोत. रुंदीकरणाचा पर्याय स्वीकारून जर समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण केले तर आर्थिक, सामाजिक आणि तांत्रिक दृष्ट्या कुठल्या अडचणी उभ्या राहू शकतील याचा आढावा आपण मागील दोन भागातून घेतलेला आहे. मात्र अजूनही असे काही मुद्दे आहेत ज्यांचा विचार यादरम्यान होणे आवश्यक आहे.

जुन्या महामार्गांचे रुंदीकरण करून समृद्धी महामार्ग का बांधला जाऊ शकत नाही हे समजावून घेण्यासाठी विविध मुद्दे लेखमालिकेतील मागील दोन भागात आपण वाचले असतीलच. मुळात समृद्धी महामार्गाची जुन्या तंत्रज्ञानाचा वापर करून बांधलेल्या महामार्गांबरोबर तुलना करणे योग्य होणार नाही. जुन्या महामार्गांचा अभ्यास केला तर लक्षात येईल की १२० मीटर रुंद अशा प्रस्तावित समृद्धी महामार्गांच्या तुलनेत जुन्या महामार्गांची रुंदी ही खूपच कमी आहे. जसे की , उदाहरणार्थ गावातील रस्ते हे २० मीटर रुंद असतात, राज्य महामार्ग हे ३० मीटर असतात तर राष्ट्रीय महामार्ग हे ४५ ते ६० मीटर रुंदीचे असतात. त्यामुळे जर इतक्या छोट्या रस्त्यांचे रुंदीकरण करून रस्ता बांधायचा म्हटला तरी ही अपेक्षा वास्तविकतेला धरून नाही.

जुन्या महामार्गांची जमिनीपासूनची उंची ही तुलनेने कमी आहे त्यामुळे मुळात नुसते रुंदीकरण करून प्रश्न सुटेल असे नाही तर ७०० किलोमीटरच्या महामार्गाची उंची वाढवून हा महामार्ग बांधावा लागेल. थोडक्यात सदरचा पर्याय जुना महामार्ग नष्ट करून नवीन बांधल्यासारखा होईल ते देखील आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य न होता. या नव्या महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी नव्या आरेखनरूप मूलभूत सुविधा देण्यासाठी काही विशिष्ट जागा विकसित केल्या जाणार आहेत मात्र रुंदीकरणाचा पर्याय स्वीकारून हा नवा महामार्ग बांधल्यास स्वच्छतागृहे, हॉटेल्स यांच्यासाठी वेगळी जागा निश्चित करावी लागेल.

जुन्या व नव्या महामार्गांच्या परिमाणांमध्ये ही कालानुरूप बरेच बदल झालेले असतात त्यामुळे जुन्या महामार्गांना नव्या तंत्रज्ञाचा वापर करून तयार करण्यासाठी अधिक श्रम व पैसे खर्च होतो. महामार्गाच्या गुणवैशिष्ट्यांवर ही त्याचा विपरीत परिणाम होतो.

लेखमालिकेतील तीन ही भाग वाचल्यावर आपल्या हे लक्षात येईल की जुन्या महामार्गांचे रुंदीकरण करून नवा समृद्धी महामार्ग बांधणं हे कुठल्याच बाबतीत संयुक्तिक होणार नाही त्यामुळे समृद्धीसाठी रुंदीकरण हा पर्याय नव्हे! अशाच अनुमानापर्यंत अभ्यासाअंती आपण पोचतो.

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकीच्या आधारे राज्यातल्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणार आहे.

प्रकल्पाविषयी

संपर्कासाठी

 • महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित
  नेपिअन सी रोड, प्रियदर्शिनी पार्क,
  मुंबई ४०० ०३६, महाराष्ट्र.
 • ९१ २२ २३६८५९०९,
  ९१ २२ २६५१७९००,
  फॅक्स : ९१ २२ २६४१७८९३.
 • info@msrdc.org