समृद्धीसाठी रस्ता रुंदीकरण हा पर्याय नव्हे ! भाग २

सध्या अस्तित्वात असलेल्या महामार्गांचे रुंदीकरण करून समृद्धी महामार्ग बांधण्याचा पर्याय योग्य व वस्तुस्थितीला धरून नसल्याचे विविध मुद्यांवरून स्पष्ट होते. सामाजिक तसेच आर्थिक गणितांचा विचार केला तर असे काही मुद्दे आपण मागील भागात समजावून घेण्याचा प्रयत्न केला. या भागात आपण तांत्रिक मर्यादांच्या मुद्यांचा विचार करणार आहोत. रुंदीकरण करून समृद्धी महामार्ग बांधायचा म्हटला तर अनेक तांत्रिक अडचणींचाही महामंडळाला विचार करावा लागतो. अशाच काही तांत्रिक अडचणींबद्दल थोडंसं...

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा फक्त आजची म्हणजेच वर्तमानातील वाहतुकीची गरज लक्षात घेऊन बांधला जात नाहीये तर दूरदृष्टी ठेऊन पुढील किमान २० वर्षात वाढणाऱ्या गाड्यांची संख्या आणि लोकसंख्या या सर्व बाबींचा विचार करून हा प्रकल्प आखण्यात आलेला आहे. सुरवातीला प्रत्येकी ३ पदरांचे बांधकाम वेगाने पूर्ण करून हा महामार्ग खुला केला जाईल मात्र काळानुरूप जास्त पदरांची गरज भासली तर त्याची सोयही महामंडळ आधीच करून ठेवणार आहे ज्यामुळे भविष्यात पदर वाढवायची वेळ आली तरी महामार्गावरील वाहतुकीला अडथळा होऊ न देता सुरळीतपणे काम करणे शक्य होईल. समोरासमोर येऊन गाड्यांचे होणारे भीषण अपघात टाळण्यासाठी महामार्गाच्या मध्यावर १५ मीटर रुंदीचे दुभाजक (median) बांधले जाणार आहेत. त्यात वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोलही राखला जाणार आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे संपूर्ण महामार्ग हा मुख्य जमिनीपासून ३ मीटर उंच असणार आहे. सुरक्षितता आणि महामार्गाचे बांधकाम मजबूत व्हावे यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. काही ठिकाणी हीच उंची ११ मीटर ही असू शकते. आता जर जुन्या महामार्गांचे रुंदीकरण करायचे ठरवल्यास अस्तित्वातील संपूर्ण डांबरी पृष्ठभाग नवीन समृद्धी महामार्गाच्या १५ मीटर रुंदीच्या दुभाजकादरम्यानच लुप्त होऊन जाईल त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेला संपूर्ण मार्ग रद्दबादल ठरवून नव्याने महामार्गाचे बांधकाम करणे सर्वच बाबतीत व्यवहार्य पर्याय असल्याचे यातून समोर येते.

टेलिफोन लाईन्स, गॅस व ऑइल पाईप लाईन्स , इलेकट्रीसिटी आणि फायबर ऑप्टिक्स लाईन्ससाठीही विशेष मार्ग राखीव ठेवण्यात आलेले आहेत. नव्या महामार्गाच्या लगत प्रत्येकी ७ मीटर रुंदीचे २० ते २५ ठिकाणी सर्व्हिस रोडचे बांधकाम केले जाणार आहे ज्याद्वारे नजीकच्या गावातील लोकांनाही प्रवास करणे सुलभ होईल. हे सर्व्हिस रोड ७ मीटर (रुंदी) x ३ मीटर ( उंची ) असलेल्या अंडर पासेसच्या माध्यमातून आडवे जोडले जाणार आहेत. एवढ्या मोठ्या जागेची उपलब्धता जुन्या महामार्गामधून उपलब्ध करून घेणे शक्य होणार नाही.

१५० किलोमीटर प्रती तास ( म्हणजेच प्रती सेकंद २७२ फूट ) या गतीने गाडी चालवायची असल्यास पुढील किमान ३६५ मीटर रस्ता चालकाला स्पष्ट दिसणे ही चालकाची प्राथमिक गरज असते. ही तांत्रिक बाब लक्षात घेऊन महामंडळाने या महामार्गाची आखणी केली आहे. सध्याच्या महामार्गावर असलेली वळणे लक्षात घेता सलग किमान ३६५ मीटरचा रस्ता स्पष्ट दिसेल असे बदल विद्यमान महामार्गावर करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य होणार नसून आर्थिकदृष्ट्याही हा पर्याय व्यवहार्य ठरत नाही. १५० किलोमीटर प्रती तास गाडी चालवून वेगवान प्रवासाचे उद्दिष्ट साध्य करता येणार नाही. सध्याच्या महामार्गांचे रुंदीकरण करून जर समृद्धी महामार्ग बांधायचा म्हटला तर आरेखनात किमान ३०% बदल करावे लागतील. जे कुठल्याच बाबतीत व्यवहार्य होणार नाही.

१५० किलोमीटर प्रती तास गाडी चालवताना वळणावर जर चालकाला गाडीवरचा ताबा न सुटू देता गाडीची दिशा किमान १ मीटर ने जरी बदलायची असेल तरी त्यासाठी रस्ता बांधताना १५ मीटर परिघाच्या रुंदीचे बांधकाम सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महामंडळाला करावे लागते.

या तांत्रिक मुद्यांसोबत आणखी असे अनेक मुद्दे आहेत ज्याबद्दल आपण तिसऱ्या आणि लेख मालिकेच्या अखेरच्या भागात प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. याद्वारे हे पुन्हा पुन्हा अधोरेखित होत आहे की सध्या अस्तित्वात असलेल्या महामार्गांचे रुंदीकरण करून या प्रकल्पामागील समृद्धीचा विचार प्रत्यक्षात उतरू शकणार नाही.

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकीच्या आधारे राज्यातल्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणार आहे.

प्रकल्पाविषयी

संपर्कासाठी

 • महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित
  नेपिअन सी रोड, प्रियदर्शिनी पार्क,
  मुंबई ४०० ०३६, महाराष्ट्र.
 • ९१ २२ २३६८५९०९,
  ९१ २२ २६५१७९००,
  फॅक्स : ९१ २२ २६४१७८९३.
 • info@msrdc.org