समृद्धीसाठी रस्ता रुंदीकरण हा पर्याय नव्हे ! भाग १

मुंबई आणि नागपूर या महाराष्ट्रातील दोन मुख्य शहरांना जोडण्यासाठी नव्याने बांधण्यात येणाऱ्या महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची घोषणा झाल्यानंतर सर्व स्तरातून या प्रकल्पाचे स्वागत झाले. राज्याच्या विकासाला एका नव्या उंचीवर घेऊन जाणाऱ्या या महामार्गासंबंधित अनेक प्रश्न आणि सूचना देखील नागरिकांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून महामंडळापर्यंत पोचवल्या. लोकांनी विचारलेल्या या सर्व प्रश्नांमधून एक प्रश्न अधिक ठळकपणे महामंडळासमोर आला आणि तो प्रश्न असा होता की " या प्रकल्पासाठी नव्याने जमीन एकत्रित करण्यापेक्षा जुन्या महामार्गांचे रुंदीकरण करून हा समृद्धी महामार्ग का बांधला जाऊ नये ?" ह्या प्रश्नाच्या उत्तराला विविध पैलू आहेत. संबंधित प्रश्नाचे उत्तर देताना विविध मुद्यांचा विचार करून ते मुद्दे लोकांसमोर ठेवण्याचा केलेला प्रयत्न आम्ही लेख मालिकेच्या स्वरूपात आपल्यापर्यंत पोचवत आहोत. समृद्धीसाठी रुंदीकरणाचा पर्याय व्यवहार्य का नाही ? कुठल्या तांत्रिक बाबींमुळे रुंदीकरणाचा पर्याय स्वीकारता येणार नाही ? या संबंधित मुद्यांचा आढावा घेण्याचा केलेला हा एक प्रयत्न...

महाराष्ट्रातील मुंबई आणि नागपूर ही महत्वाची दोन शहरं.. आज एकमेकांपासून ७८० किलोमीटरहून अधिक लांब आहेत.आजच्या घडीला हे अंतर कापण्यासाठी सामान्यतः १४ ते १५ तास लागतात. मालवाहतूकीचा विचार केला तर प्रवासाचा हाच कालावधी आणखी वाढतो. ज्यामुळे राज्यातील काही भागांची प्रगती मंदावते. मात्र पक्के आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बांधलेले रस्ते ही नकारात्मक परिस्थिती नक्कीच बदलू शकतात. प्रस्तावित महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून प्रगतीसाठी आवश्यक असलेला हाच सकारत्मक बदल राज्यात घडेल असा महामंडळाला पूर्ण विश्वास आहे. वेगवान दळणवळणातून व्यापार वृद्धी साधून या दोन शहरातील अंतर कमी होण्यासोबतच कमीत कमी वेळेत हा प्रवास पूर्ण होणे ही आजच्या काळाची गरज बनली आहे. महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून या दोन मुख्य शहरातील अंतर कमी होणार आहे. एवढच नाही तर प्रवासाला लागणारा वेळ १५ तासांवरून ८ तासांवर येणार आहे. यासाठीच हा नवा मार्ग आखण्यात आलेला असून जुन्या महामार्गांचे रुंदीकरण करून ही गुणवैशिष्ट्ये साध्य करता येणार नाही असे महामंडळाचे ठाम मत आहे. जुने महामार्ग हे नव्या आधुनिक प्रणालींचा उपयोग करून नव्याने बांधणे हे काम अधिक क्लिष्ट, अवघड आणि खर्चिक असेल. ज्या जिल्ह्यांमधून सध्या अस्तित्वात असलेला जुना महामार्ग जातो त्या प्रत्येक जिल्ह्यातील भौगोलिक आणि सामाजिक परिस्थितीमध्ये असलेली तफावत आणि रुंदीकरण करण्यासाठी जागेची असलेली उपलब्धता भिन्न आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टींची मोट बांधून आधुनिक सुख-सोयींनीयुक्त समृद्धी महामार्ग रुंदीकरणाचा पर्याय स्वीकारून बांधणे महामंडळाला शक्य होणार नाही.

जुन्या महामार्गांचे रुंदीकरण करून समृद्धी महामार्ग बांधणे यात अनेक तांत्रिक अडचणी तर आहेतच पण तसे केल्यास अधिक प्रश्न निर्माण होण्याची भिती ही आहे. महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी बांधण्यात येणारा रस्ता हा १२० मीटर रुंद असणार आहे. समृद्धी महामार्गासाठी जुन्या महामार्गांचे रुंदीकरण किंवा विस्तारीकरण करायचे म्हटले तर सध्या अस्तित्वात असलेल्या महामार्गांच्या आजूबाजूला दाट लोकवस्तीची जी गावं आहेत तेथील नागरिकांना विस्थापित करावे लागेल. ज्यामुळे लोकांचा विस्थापनाचा प्रश्न उद्भवेल. अशा विस्थापितांचे पुनर्वसन करण्यासाठी अधिक श्रम आणि पैसा खर्च करावा लागेल ज्यामुळे प्रकल्पाच्या एकूण आर्थिक गणितांवरही त्याचा विपरित परिणाम होईल. रुंदीकरणाचा पर्याय न स्वीकारता जर ठरलेल्या आरेखनारूप महामार्ग बांधला तर निश्चितच हा विस्थापितांचा प्रश्न उद्भवणार नाही.

दुसरीकडे सध्या अस्तित्वात असलेल्या महामार्गांना लागून जी गावं आहेत ती थेट महामार्गाशी जोडली गेलेली आहेत त्यामुळे सध्या महामार्गांवर अपघातांचं प्रमाण ही अधिक आहे. महाराष्ट्र समृद्धी महामार्गाद्वारे अपघातांचं प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने आजूबाजूची गावे महामार्गाशी थेट न जोडता सर्व्हिस रोड तसेच अंडर पासेसच्या माध्यमातून जोडण्यात येणार आहेत. ज्यामुळे अपघातांना आळा बसेल. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे सर्व वैशिष्ट्यपूर्ण बदल साध्य करायचे असतील तर रुंदीकरणाच्या पर्यायाला छेद द्यावा लागेल.

लोकांच्या विस्थापनाचा प्रश्न, अपघात आणि सुरक्षितता यासारखे सामाजावर प्रत्यक्ष प्रभाव टाकू शकतील असे मुद्दे आणि यांसारखे आणखी ही काही तांत्रिक मुद्दे असे आहेत जे रुंदीकरणाच्या पर्यायाला रद्दबादल करत हा पर्याय वस्थुस्थितीला धरून नसल्याचे अधोरेखित करतात. अशा मुद्यांची सविस्तर चर्चा भाग २ मध्ये आपण करणार आहोत.

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकीच्या आधारे राज्यातल्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणार आहे.

प्रकल्पाविषयी

संपर्कासाठी

 • महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित
  नेपिअन सी रोड, प्रियदर्शिनी पार्क,
  मुंबई ४०० ०३६, महाराष्ट्र.
 • ९१ २२ २३६८५९०९,
  ९१ २२ २६५१७९००,
  फॅक्स : ९१ २२ २६४१७८९३.
 • info@msrdc.org