"समतोल" विकास व्हाया महाराष्ट्र समृद्धी महामार्ग

"समतोल" विकास व्हाया महाराष्ट्र समृद्धी महामार्ग
प्रस्तावित महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा प्रकल्प महाराष्ट्राच्या विकासाला एक नवी दिशा देणारा ठरणार आहे. या महामार्गाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील जनतेसाठी विकासाची आणि प्रगतीची अनेक दारं खुली होणार आहेत. केवळ दळणवळण गतिशील होईल असे नाही तर समतोल विकासाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला विकासाच्या समान संधी ही उपलब्ध करून देण्याचा महामंडळामार्फत प्रशासन प्रयत्न करत आहे.. नक्की या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्याचा समतोल विकास साधण्यासाठी महामंडळ कुठल्या उपाययोजना करत आहे ? आणि हा समतोल विकास साध्य करण्यासाठी केलेल्या उपपाययोजना राज्याला कशा समृद्ध करतील ? हा समतोल विकासाचा पॅटर्न ग्रामीण भागातून शहरात होणाऱ्या स्थलांतराच्या प्रश्नाला कसे उत्तर देईल? याचा आढावा घेण्याचा केलेला हा एक प्रयत्न…

पक्के रस्ते हे विकासाचं पहिलं द्योतक मानले जातात. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच उदाहरण घेतलं तर हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई पुण्याची विकासाची गती किती पटींनी वाढली हे काही वेगळं सांगायला नको मात्र यासारखे आणखी द्रुतगती महामार्ग प्रकल्प आज महाराष्ट्रात बांधण्याची गरज निर्माण झाली आहे ज्याच्या माध्यमातून राज्याचा सर्वांगीण आणि समतोल विकास सहज साध्य करता येऊ शकेल.

आजच्या घडीला महाराष्ट्रातील परिस्थितीचा विचार केला तर महाराष्ट्राचा विकास हा ठराविक ठिकाणी केंद्रित झाल्याचे आढळून येते. विकासाचे झालेले हे केंद्रीकरण आज महाराष्ट्राच्या समतोल व सर्वांगीण विकासात मोठा अडथळा ठरत आहे. महाराष्टाच्या पूर्वेकडील विदर्भ किंवा मराठवाड्यासारख्या भागात जर समतोल विकास साधायचा असेल तर उत्कृष्ट पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने काही विशेष प्रयत्न होणे आवश्यक आहे. महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्प हा यापैकीच एक प्रयत्न... सर्व गोष्टी अभ्यासून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) राज्याच्या समतोल विकासासाठी या समृद्धी प्रकल्पाची आखणी केली आहे.

जेंव्हा कुठलाही महामार्ग बांधून पूर्ण होतो तेंव्हा गतिमान दळणवळणाच्या सोयीमुळे दोन गावं, दोन शहरं एकमेकांशी वेगाने जोडली जातात. याचबरोबर महामार्गानजीक उद्योगधंदे वाढीस लागतात. उद्योगधंदे वाढीस लागले की त्या भागात लोकांची ये-जा वाढते. उद्योगांच्या पायाभरणी च्या माध्यमातून गावातील लोकांना रोजगार मिळू लागतो. रोजगाराच्या नवनवीन संधी वास्तव्यास असलेल्या भागाजवळच तयार झाल्यामुळे नोकरी - धंद्यातून उदरनिर्वाहासाठी शहराकडे वळलेली पावले आपल्या गावातच स्थिरावतात. यानिमित्ताने महामार्गानजीक शाळा , दवाखाने , बाजारपेठा यांसारख्या मूलभूत सुविधा पुरवणाऱ्या संस्थाही वाढीस लागतात.शेती उत्पादनांना योग्य पद्धतीने साठवण्यासाठी शीतगृहांच्या बांधणी सोबत त्यांना कमी वेळेत बाजारपेठेपर्यंत पोचवण्यासाठी ही प्रशासन विशेष प्रयत्न यादरम्यान करताना पाहायला मिळेल.

महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून असाच समतोल विकास घडवून राज्य खऱ्या अर्थाने समृद्ध करायचं असा विचार प्रशासनाने केला आहे यासाठी प्रथमच महाराष्ट्रात महामार्गानजीक नवी शहरे बसवण्याची संकल्पना पुढे आली. या संकल्पनेतूनच पुढे कृषी समृद्धी केंद्र विकसित करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. ज्याद्वारे ग्रामीण भागातील लोकांसाठी कौशल्य कार्यक्रम राबवून त्यांना रोजगारक्षम करण्यासाठीही प्रशासन विशेष प्रयत्न करणार आहे. शहरी सुविधांसोबत मूलभूत सोयी आणि रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रशासनाचा मानस आहे.

प्रस्तावित महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या बाजूने गॅस पाईपलाईन, इलेकट्रीक केबल्स, वायफाय व फायबर ऑप्टिक्स चे मोठे जाळे तयार करून ग्रामीण भागाला दूरसंचार व ऊर्जा क्षेत्रातील अत्याधुनिक सोयी सुविधा पुरवण्याचे उद्दिष्ट ही महामंडळाने डोळ्यासमोर ठेवले आहे. ज्या जमीन मालकांनी आपली जमीन महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पात गुंतवली आहे अशा महामार्गानजीक वास्तव्यास असलेल्या लोकांसाठी समतोल विकासाचा हा पॅटर्न राबवणे आजच्या घडीला राज्यात अत्यंत महत्वाचे झाले आहे.

कच्या आणि पक्क्या मालाची ने आण जरी या प्रकल्पाच्या निमित्ताने अधिक वेगवान झाली आणि स्थलांतराचा प्रश्न जरी अंशतः मार्गी लागला तरी आज ज्या नागरी सुविधा मोठ्या शहरांमध्ये अगदी सहज मिळतात त्या जर या समृद्धी महामार्गाच्या निमित्ताने भविष्यात महामार्गानजीकच्या भागातील लोकांना ही मिळू लागल्या तर आजच्या घडीला ग्रामीण भागातून शहरात होणारी स्थलांतरे सुद्धा कमी होतील आणि स्वतःसोबत राज्याचा आणि पर्यायाने देशाचा विकास करू पाहणाऱ्या नागरिकांना समान संधी मिळून निश्चितच प्रत्येकाच्या घरात समृद्धी नांदेल.

Maharashtra Samruddhi Mahamarg

Maharashtra Samruddhi Mahamarg aims at providing an impetus to the overall development of rural areas by attracting domestic and foreign investments.

About Project

Get in touch

 • Maharashtra State Road Development Corporation Ltd
  Napean Sea Road, Priyadarshini Park,
  Mumbai 400 036, Maharashtra, India.
 • 91 22 23685909,
  91 22 26517900,
  Fax: 91 22 26417893.
 • info@msrdc.org