शेतक-याच्या जमिनीचा मोबदला आरटीजीएसद्वारे थेट खात्यात जमा

शेतक-याच्या जमिनीचा मोबदला आरटीजीएसद्वारे थेट खात्यात जमा

शहापूरच्या शेतक-यांनी समृद्धी महामार्गासाठी थेट खरेदी पद्धतीने दिली जमीन

1.97 हेक्टर जमिनीची अधिग्रहण, 1.84 कोटी रुपयांचा दिला मोबदला

ठाणे, 15 जुलै, 2017 : महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी नागपूर येथून जमीन अधिग्रहण प्रक्रियेची यशस्वी सुरुवात झाल्यानंतर आता ठाणे जिल्ह्यात शनिवारी 15 जुलै रोजी पहिले जमीन अधिग्रहण व्यवहार यशस्वीरित्या पार पडले असून, विक्री कराराची नोंदही झाली आहे. शहापूर तालुक्यातील हिव गावाचे श्री गणपत दगडू धामने आणि श्री दौलत श्रीराम धानके आणि वशाला बुद्रुक गावाचे श्री गणेश पांडुरंग राऊत यांनी समृद्धी महामार्गासाठी आपली एकूण 1.97 हेक्टर जमीन दिली आहे.

या सर्व शेतक-यांच्या जमिनीचा विक्री करार झाल्यानंतर लगेचच आरटीजीएस पद्धतीने त्यांच्या बँक खात्यांमध्ये एकूण 1.84 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. श्री धामने यांना 72 लाख रुपये, श्री धानके आणि श्री राऊत यांना अनुक्रमे 79 लाख रुपये आणि 32 लाख रुपये मोबदला मिळाला आहे.

महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाममंत्री श्री एकनाथ शिंदे, एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री किरण कुरुंदकर आणि ठाण्याचे जिल्हाधिकारी श्री महेंद्र कल्याणकर तथा उपजिल्हाधिकारी श्रीमती रेवती गायकर आदी यावेळी उपस्थित होते. या यशस्वी व्यवहारानंतर आता ठाणे जिल्ह्यात या महामार्गासाठी जमीन अधिग्रहीत करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. राज्य सरकार या महामार्गासाठी ठाणे जिल्ह्यात शहापूर, भिवंडी आणि कल्याण तालुक्यातून एकूण 582.5 हेक्टर जमीन अधिग्रहीत करणार आहे.

या यशस्वी व्यवहाराबद्दल आनंद व्यक्त करताना श्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आता या महाप्रकल्पासाठी ठाणे जिल्ह्यात जमीन अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या शेतक-यांशिवाय 323 लोकांनी आपली जमीन या नागूपर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेसवे प्रकल्पाला देण्यासाठी राज्य सरकारला संमती दिली आहे. शेतक-यांच्या संमतीने जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरु झाली असून, त्यांच्या खात्यात आता थेट मोबदलाही लगेच दिला जात आहे.

श्री शिंदे यांनी पुन्हा एकदा सांगितले की, राज्य सरकारकडून शेतक-यांच्या संमतीनेच जमीन अधिग्रहण करण्यात येणार आहे. त्यासाठी थेट खरेदी योजनेचा वापर केला जात आहे. या प्रकल्पासाठी आपली जमीन देण्याची तयारी शेतकरी स्वत:हून दाखवत असून, या विकास प्रक्रियेत ते सहभागी होत असल्याचा आनंद आहे. महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा ख-या अर्थाने समृद्धीचा महामार्ग असेल. हा महामार्ग राज्याच्या विकासाला नवा वेग देणारा आणि आर्थिक स्थैर्य देणारा असेल, असेही ते म्हणाले.

ठाणे जिल्ह्यातील शेतक-यांनी या प्रकल्पासाठी जमीन देण्याची संमती दर्शवणे म्हणजे जनतेचा या सरकारवर विश्वास असण्याचे द्योतक आहे. आता इतर जिल्ह्यातही लवकरच अधिग्रहणाची ही प्रक्रिया सुरू होणार आहे. राज्य सरकार राज्यातील संपूर्ण विकासासाठी कटिबद्ध आहेच. या नवीन समृद्धी महामार्गामुळे राज्यात जागतिक दर्जाची पायाभूत सुविधाही मिळणार आहे, असेही श्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

माध्यम प्रतिनिधींशी बोलताना श्री शिंदे म्हणाले की, राज्यातील रस्त्यांचा विकास करणे ही आजच्या काळाची गरज असून त्यासाठी सर्वांचेच सहकार्यही अपेक्षित आहे. प्रत्येक शेतकरी आनंदी राहावा, त्याच्या चेह-यावर हास्य असावे, असा राज्य सरकारचा उद्देश आहे.

शेतक-यांनीही आपण या विकास प्रक्रियेत सहभागी होत असल्याबद्दल माध्यम प्रतिनिधिंसमोर समाधान व्यक्त केले. राज्याच्या विकासासाठी आम्ही आमची जमीन स्वत:हून देत असल्याचा आनंद आहे, असेही त्यांनी सांगितले. श्री किरण कुरुंदकर आणि श्री महेंद्र कल्याणकर यांनीही यावेळी आपली मते मांडली आणि महामार्गासाठी सुरु झालेल्या या प्रक्रियेबद्दल समाधानही व्यक्त केले.

Maharashtra Samruddhi Mahamarg

Maharashtra Samruddhi Mahamarg aims at providing an impetus to the overall development of rural areas by attracting domestic and foreign investments.

About Project

Get in touch

 • Maharashtra State Road Development Corporation Ltd
  Napean Sea Road, Priyadarshini Park,
  Mumbai 400 036, Maharashtra, India.
 • 91 22 23685909,
  91 22 26517900,
  Fax: 91 22 26417893.
 • info@msrdc.org