विकासातून समृद्धीचा महामार्ग

२०१५ साली मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची घोषणा विधानसभेत केल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेच्या मनात या संपूर्ण प्रकल्पाविषयी मोठी उत्सुकता असल्याचे निदर्शनास आले होते म्हणूनच या प्रकल्पासाठीच्या जमीन मोजणीचा टप्पा पूर्णत्वास येत असताना चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील आजपर्यंतच्या सर्वात मोठा प्रकल्प ठरू पाहणाऱ्या या महाराष्ट्र समृद्धी महामार्गाबद्दल...

महाराष्ट्र हा देशाच्या विकासात कायमच आपली महत्वाची अशी भूमिका बजावत आला आहे. नवे तंत्रज्ञान व जोडीला कुशल मनुष्यबळ याच्या जोरावर महाराष्ट्राने विकासाची पताका कायमच उंच धरलेली आहे. महाराष्ट्रातील नागरिकांना अन्न , वस्त्र व निवारा या मूलभूत गरजांच्या बरोबरीने पायाभूत सुविधा देऊन त्यांचे राहणीमान उंचावण्याचा प्रयत्न प्रशासनातर्फे नेहमीच केला गेला आहे.

पक्या रस्त्यांच्या माध्यमातून सुरक्षित व जलद प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ गेली २१ वर्षे आपली भूमिका चोख पार पाडत आहे. मुंबई-पुणे यादरम्यान च्या वाहतुकीवरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने बांधण्यात आलेला मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग असो किंवा जगभरातील पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा बांद्रा-वरळी सी लिंक असो, शेकडो कोटींच्या अशा मोठ्या प्रकल्पांसोबतच महाराष्ट्रातील छोट्या मोठ्या शहरांना जोडण्याचं महत्वाचं काम ही त्यांनी पूर्णत्वास नेले आहे.

या विकास परंपरेला पुढे घेऊन जात प्रशासन आता ७०० किलोमीटर च्या महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या बांधणीची तयारी करत आहे. या महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून महाराष्ट्राची राजधानी मुंबई व उपराजधानी नागपूर यांना अधिक वेगाने जोडण्याचं महत्वपूर्ण काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने आपल्या खांद्यावर घेतलेले आहे. सुलभ प्रवासासोबत महाराष्ट्रातील ग्रामीण भागांना जोडून त्यांना विकास प्रक्रियेत सामावून घेण्याचा प्रयत्न यानिमित्ताने सुरु आहे. मुंबई आणि नागपूर या केवळ दोन मुख्य शहरांच्या विकासाचा विचार न करता या समृद्धी महामार्गाच्या आरेखनात येणाऱ्या ३९२ हून अधिक गावांचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रशासनाचा मानस आहे. प्रस्तुत महाराष्ट्र समृद्धी महामार्गालगत अत्याधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण अशी २० हून अधिक कृषी समृद्धी केंद्र वसवण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील रोजगारातही मोठी वाढ यानिमित्ताने अपेक्षित असल्याचे जाणकार सांगत आहेत. २१ व्या शतकातील आधुनिक औद्योगिक क्रांतीला महाराष्ट्रातील ग्रामीण भाग या प्रकल्पाच्या निमित्ताने साक्षी ठरेल कारण मोठे उद्योग या महामार्गालगत मोठी गुंतवणूक करण्यासाठी पुढे सरसावत आहेत यामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल व अविकसित भागाचा चेहरामोहरा बदलेल.

महाराष्ट्रातील ठाणे, नाशिक , अहमदनगर, औरंगाबाद , जालना, बुलढाणा, वाशिम, अमरावती ,वर्धा नागपूर अशा १० जिल्ह्यातून हा महामार्ग मार्गक्रमण करेल. या १० जिल्ह्यातील शिर्डी, त्र्यंबकेश्वर, शेगाव यासारखी धार्मिक स्थळे आणि अजिंठा- वेरूळ यासारखी पर्यटन स्थळे अधिक वेगाने यामुळे जोडली जातील आणि त्यानिमित्ताने पर्यटन व्यवसायाची ही भरभराट होईल. वेगवान दळणवळणाच्या या पर्यायामुळे शेतमालाची आयात निर्यात करणे ही सोपे होईल व शेतकऱ्यांचे जीवनमान ही उंचावेल.

सुमारे ४६ हजार कोटी रुपयाच्या या महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पादरम्यान ज्यांच्या जमिनींचा वापर प्रकल्पाच्या उभारणीत केला जाणार आहे अशा सर्व जमीनधारकांना अधिकाधिक फायदा मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने १० जिल्ह्यांमध्ये प्रथमच "लँड पुलिंग" (जमीन एकत्रीकरण) सारखी अभिनव योजना आखली आहे . यामुळे जलद गतीने विकासाची गंगा महाराष्ट्रातून वाहणार यात काही शंका नाही.

जमीन मोजणी प्रक्रियेचा अंतिम टप्पा लवकर पूर्ण करून महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची बांधणी आता लवकरच सुरु होणार आहे. या सर्वाधिक लांबीच्या प्रकल्पाच्या निमित्ताने महाराष्ट्राची मान फक्त देशातच नव्हे तर संपूर्ण जगात उंचावली जाईल.

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकीच्या आधारे राज्यातल्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणार आहे.

प्रकल्पाविषयी

संपर्कासाठी

 • महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित
  नेपिअन सी रोड, प्रियदर्शिनी पार्क,
  मुंबई ४०० ०३६, महाराष्ट्र.
 • ९१ २२ २३६८५९०९,
  ९१ २२ २६५१७९००,
  फॅक्स : ९१ २२ २६४१७८९३.
 • info@msrdc.org