महाराष्ट्र समृद्धी कॉरिडोरला (एमएससी) ठाणे जिल्ह्यात शेतक-यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र समृद्धी कॉरिडोरला (एमएससी) ठाणे जिल्ह्यात शेतक-यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फुगाळे, वाशाळा बुद्रुक व टोकरखांड गावांतील शेतक-यांची समृद्धी कॉरिडोरच्या जमिनीसाठी संमती

ठाणे जिल्ह्यातून समृध्दीसाठी आता मिळाली ४८१ हेक्टर जागेची संमती

ठाणे, 13 जानेवारी 2017 : नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्पेस हायवे अर्थात महाराष्ट्र समृद्धी कॉरिडोरला ठाणे जिल्ह्यातील शेतक-यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. ठाणे जिल्ह्यात शहापूर तालुक्यापासून जवळ असलेल्या फुगाळे तसेच वाशाळा बुद्रुक व टोकरखांड गावांतील बहुसंख्य शेतक-यांनी या समृद्धी कॉरिडोरला जमीन देण्यासाठी संमती दिली आहे.

महाराष्ट्र समृद्धी कॉरिडोरच्या विकासाच्या दृष्टीने हे ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे. महाराष्ट्राला नवी समृद्धी आणणा-या आणि पायाभूत सुविधांचा चेहरामोहराच बदलून टाकणा-या महाराष्ट्र समृद्धी कॉरिडोर या बहुप्रतिक्षित प्रकल्पासाठी फुगाळे गावातील जवळपास 76 शेतक-यांनी त्यांची एकूण सुमारे 311 हेक्टर, वाशाळा बुद्रुक येथील २५ शेतकरयांनी एकूण १४० हेक्टर व १७ शेतकरयानी एकूण ३० हेक्टर जागा समृध्दी हायवेसाठी देण्याची संमती दर्शविली आहे.

शुक्रवारी फुगाळे गावामध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने या गावांतील शेतकरी जमले होते. यावेळी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार हे जातीने गावात उपस्थित होते. त्यांच्याकडे शेतकरयानी जमीन संमतीचे पत्र दिले. हे संमतीपत्र स्विकारून गाव-परिसरातून हा महामार्ग जावा तथा त्याचे काम सुरू करावे अशी मागणीही फुगाळे आणि परिसरातील गावांतील शेतक-यांनी यावेळी केली.

आजघडीला दूर्गम भागात असलेल्या या दोन्ही गावांतील शेतकरी मूलभूत पायाभूत सुविधांपासूनही वंचित आहेत. परंतु, जेव्हा हा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्प पूर्ण होईल, तेव्हा ही गावे आणि आजूबाजूचा परिसर चांगल्या पायाभूत सुविधांनी इतर शहरांशी जोडले जातील आणि त्यातून या गावांमध्ये समृद्धीही नांदेल.

यावेळी उपस्थित शेतकरयांसमोर बोलताना एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार म्हणाले की, ‘‘फुगाळे, वाशाळा बुद्रुक व टोकरखांड गावांतील शेतक-यांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आम्हाला खूप आनंद आहे. या गावांतील शेतक-यांनी केवळ जमीन संपादन करण्यास संमतीच दिली नाही तर, त्यांनी या समृद्धी प्रकल्पासाठी एक ऐतिहासिक पाऊलही टाकले आहे. एवढेच नाही तर संपूर्ण राज्यातील विकासासाठी स्वयंस्फुर्तीने सहभाग घेण्याची तयारी दाखवून शेतक-यांनी एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.’

या प्रसंगी ठाण्याच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती रेवती गायकर, एमएसआरडीसीचे अधिक्षक अभियंता दत्तात्रय भोंडे, शहापूरचे तहसीलदार रवी बाविस्कर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

या प्रकल्पासाठी लँड पुलिंग ही प्रक्रिया वापरण्याचे सरकारने ठरविले आहे.

या प्रक्रियेनुसार प्रकल्पासाठी घेतलेल्या शेतक-यांच्या जमिनीच्या बदल्यात त्यांना विकसित भागात जमीन दिली जाणार आहे. याशिवाय त्यांना शेतीउत्पन्नाच्या नुकसानीची भरपाईही देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे नागपूर-मुंबई या दोन महत्त्वाच्या शहरांतील प्रवासाचा वेळ 16 तासांवरून केवळ 8 तासांवर येणार आहे. हा सुपरफास्ट कम्युनिकेशन एक्स्प्रेसवे 706 किलोमीटर लांबीचा असून यामुळे महाराष्ट्रातील 10 जिल्हे, 27 तालुके आणि 385 गावे जोडली जाणार आहेत.

ठाणे जिल्ह्यातून सुमारे 67 किमीचा रस्ता जाणार आहे. त्यासाठी 832 हेक्टर जमीन लागणार आहे. या जमिनीपैकी 230 हेक्टर वनजमीन असून, 100 हेक्टर शासकीय जमीन आहे. उर्वरित 482 हेक्टर जमीन खासगी असणार आहे. महाराष्ट्र समृद्धी कॉरिडोरसाठी एकूण संपूर्ण 1400 सर्व्हे क्रमांक जमीन संपादन करावी लागणार आहे.

सुवर्ण चतुष्कोन आणि वेस्टर्न कॉरिडोर यांच्या सोबत हा समृद्धी कॉरिडोर जोडला जाईल आणि त्यामुळे संपूर्ण राज्याची कनेक्टिव्हिटीही वाढेल.

समृद्धी कॉरिडोरमुळे महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांना मोठी झेप मिळणार असल्याचे मानले जात आहे. या प्रकल्पाच्या विकासात स्वयंस्फुर्तीने सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र समृद्धी कॉरिडोरच्या वतीने शेतक-यांना आवाहन करण्यात येत आहे. कारण या प्रकल्पामुळे केवळ तात्पुरता फायदा होणार नाही तर ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि आणि कृषी क्षेत्राचा सातत्यपूर्ण विकास होईल.

Maharashtra Samruddhi Mahamarg

Maharashtra Samruddhi Mahamarg aims at providing an impetus to the overall development of rural areas by attracting domestic and foreign investments.

About Project

Get in touch

  • Maharashtra State Road Development Corporation Ltd
    Napean Sea Road, Priyadarshini Park,
    Mumbai 400 036, Maharashtra, India.
  • 91 22 23685909,
    91 22 26517900,
    Fax: 91 22 26417893.
  • info@msrdc.org