प्रगत महाराष्ट्राचा "समृद्धी" महामार्ग

आजच्या २१ व्या शतकात सगळ्यांचंच जगणं अधिक वेगवान पण धकाधकीचं झालं आहे. कमी वेळात आणि जलदरित्या आपल्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकजण मनापासून प्रयत्न करताना दिसतोय. प्रगतीचा हाच वेग वाढावा यासाठी राज्यातील अंतर्गत जिल्हे व तालुके पक्या रस्त्यानी जोडणे ही प्रगतीची पहिली पायरी मानली जाते. महाराष्ट्राचा विचार केला तर मुंबई शहर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे आर्थिक गणित सांभाळणारे शहर म्हणून ओळखले जाते. अशा या मुंबईला जर महाराष्ट्रातील विविध शहरं व जिल्हे वेगाने जोडले गेले तर राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल. नागपूर आणि मुंबई या दोन शहरांना वेगाने जोडण्यासाठी प्रशासनाने "महाराष्ट्र समृद्धी महामार्ग" बांधण्याचे नियोजन पूर्ण केले आहे व लवकरच या संबंधित पहिल्या टप्याचे काम सुरु होईल. कसा असेल हा महामार्ग ? काय आहेत याची वैशिष्ट्ये.. जाणून घेऊया या भागात...

प्रस्तावित महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा केवळ महाराष्ट्रातील नागपूर व मुंबई या दोन शहरांनाच जोडणार आहे असे नाही तर ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर अशा तब्बल महाराष्ट्रातील एकूण १० जिल्ह्यांनाही जोडण्याचं काम हा प्रकल्प करणार आहे.

सद्यस्थितीत नागपूर हून मुंबईला यायचे असल्यास १२ हून अधिक तास प्रवास करत ८०० हून अधिक किलोमीटरचे अंतर कापावे लागते. महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पामुळे मात्र हे अंतर ७०० किलोमीटर पर्यंत कमी होणार असून पर्यायाने १२ ऐवजी अवघ्या ७ ते ८ तासात सामान्य प्रवासी आपला प्रवास पूर्ण करू शकेल. वेळ व इंधनाची बचत आणि सोबत धकाधकीच्या प्रवासातून होणारी सुटका यामुळे निश्चितच प्रवासाचा गुणात्मक स्तर उंचावेल.

हा महामार्ग एकूण ६ पदरी असून अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असा असेल. प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा हा कायमच महत्वाचा मुद्दा म्हणून प्रशासनाच्या समोर येतो. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन याला सर्वोच्च प्राधान्य देत सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्यांची आधुनिक यंत्रणा या प्रस्तावित महामार्गावर घडणाऱ्या छोट्यातल्या छोट्या गोष्टींवर नजर ठेऊन असेल.

आपत्कालीन परिस्थितीत विमानाला सुरक्षित उतरता यावे यासाठी यमुना एक्सस्प्रेस वे प्रमाणे या महामार्गाचा काही भाग धावपट्टी म्हणून उपयोगात आणला जावा अशी विशेष सुविधा करण्यात येणार आहे.

पर्यटन व्यवसायाला चालना मिळावी म्हणून प्रस्तावित महामार्गाजवळील पर्यटन व धार्मिक स्थळे ही या महामार्गाशी जोडली जाणार आहेत.

सद्यस्थितीत टोल बुथवर लागणाऱ्या गाड्यांच्या लांबच लांब रांगा हा प्रवासात मोठा अडथळा आणणारा प्रश्न म्हणून पुढे आला आहे. ही समस्या नव्याने बांधल्या जाणाऱ्या महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर उत्पन्न होऊ नये म्हणून कॅशलेस टोल बूथ ची आधुनिक यंत्रणा ही कार्यान्वित करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.

या विकास प्रकल्पादरम्यान पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी प्रशासनाने विशेष काळजी घेण्याचे सुरवातीपासूनच निश्चित केले आहे. "ग्रीन कॉरिडॉर" च्या संकल्पनेतून या संपूर्ण महामार्गाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. ज्यात विविध पर्यावरणपूरक गोष्टींचा अंतर्भाव करण्यात येणार आहे.

महामार्गानजीक असलेल्या ग्रामीण क्षेत्राला आजच्या काळातील आधुनिक दूरसंसाचार माध्यमांनी जोडता यावे यासाठी या महामार्गाखालून फायबर ऑप्टिक्स केबल टाकण्यात येणार आहेत याचसोबत संपूर्ण महामार्गावर प्रवाशांना फ्री वाय-फाय ची सुविधा देण्यासाठी प्रशासन आग्रही आहे. फायबर ऑप्टिक्स च्या विस्तीर्ण जाळ्यासोबत गॅस पाईपलाईन टाकण्याचाही मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

शून्य अपघात महामार्गाच्या कार्यक्रमांतर्गत या महामार्गावर एकही अपघात घडू नये यासाठी विशेष प्रयत्न ही प्रशासनाने चालवले आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी उपाहारगृहांची सोय विशिष्ट अंतरावर करून अत्यावश्यक सुविधाही त्याठिकाणी पुरवण्यात येणार आहे.

शेती उत्पादने जसे भाजीपाला, फळे, फुले यांसारखे नाशवंत पदार्थ ज्यांना विदेशातूनही नेहमीच मोठी मागणी असते अशा गोष्टी कमी वेळात लांब पल्यावरील बाजारपेठेत पोचून त्याला अधिकाधिक बाजार भाव मिळावा यासाठी हा महामार्ग वरदान ठरणार आहे. मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ला ही महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे अधिक वेगाने जोडले जातील.

अशा या बहुपयोगी प्रस्तावित महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे लोकार्पण हे २०१९ च्या उत्तरार्धात होणे अपेक्षित आहे. हा प्रकल्प महाराष्ट्राच्या विकासाला या निमित्ताने एक नवी दिशा देईल यात काही शंका नाही.

या महामार्गासाठी नुकतीच संयुक्त जमीन मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली. काय झालं या प्रक्रियेत ? आणि आता हा प्रकल्प कुठल्या टप्प्यावर येऊन पोचला आहे यासंबंधी वाचा पुढील भागात...

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकीच्या आधारे राज्यातल्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणार आहे.

प्रकल्पाविषयी

संपर्कासाठी

 • महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित
  नेपिअन सी रोड, प्रियदर्शिनी पार्क,
  मुंबई ४०० ०३६, महाराष्ट्र.
 • ९१ २२ २३६८५९०९,
  ९१ २२ २६५१७९००,
  फॅक्स : ९१ २२ २६४१७८९३.
 • info@msrdc.org