पर्यावरण रक्षणाकडून समृद्धीकडे

अत्याधुनिक पायाभूत सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देताना महामंडळातर्फे पर्यावरणाचा विचार नेहमीच केला जातो. महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्प टप्प्याटप्याने पुढे जात असताना महामंडळाने पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत. कोणत्या आहेत या उपाययोजना ? आणि त्यामुळे पर्यावरणाचा समतोल कसा सांभाळला जाणार आहे ? यासंबंधी पर्यावरणातून समृद्धीकडे.. या ब्लॉगच्या माध्यमातून आम्ही प्रकाश टाकायचा प्रयत्न केला आहे.

महाराष्ट्राच्या नैसर्गिक संपत्तीचा वैभवशाली वारसा महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ जपत आहे. प्रकल्पाची आखणी कारण्यापासूनच महामंडळाने पर्यावरणाचा समतोल राखत लवचिक भूमिका घेऊन प्रकल्प पूर्ण करण्याचे निश्चित केले होते. कमीत कमी प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्तीला आणि जैवविविधतेला धक्का पोचेल अशा पद्धतीने प्रकल्पाची आखणी महामंडळाने केली.

कुठल्याही महामार्ग प्रकल्पाची सुरुवात ही रस्ता आखणीने होते. या पहिल्या टप्प्यात वनसंपदेबरोबरच मानवी विस्थापन कमीत कमी व्हावे ह्या दृष्टीने संपूर्ण मार्गाची निश्चिती केली जाते. मार्ग निश्चितीची ही संपूर्ण प्रक्रिया महामंडळासाठी अतिशय आव्हानात्मक होती.

पर्यावरण संवेदनशील भाग, अभयारण्ये व वनजमीन यांना धक्का न पोचवता समाज जीवनाची हानी टाळून समृद्धीचा प्रकल्प पूर्ण करण्याचे आव्हान सुरवातीपासूनच महामंडळासमोर होते.

महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची प्राथमिक आखणी करताना खालील बाबींचा अभ्यास करून महामंडळाने महामार्गाची आरेखन प्रक्रिया पूर्ण केली --

 • प्रस्तावित समृद्धी महामार्गासाठी कमीत कमी वनजमिनींचा वापर करणे.
 • पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील भाग जसे कि अभयारण्ये वगळण्याचा प्रयत्न करणे..
 • ऐतिहासिक व धार्मिक महत्व असलेली क्षेत्रं वगळणे.
 • प्रस्तावित मार्गासाठी पडीक जमिनींचा शक्यतो अधिकाधिक वापर करणे.
 • अधिकाधिक उड्डाणपूल, लहान पूल व मोरी (culvert) बांधून पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहांचे जतन करणे.
 • वळणांवरील त्रिज्येची मर्यादा २०० मीटर ठेऊन मर्यादित वळणांचे बांधकाम करणे.
 • प्रकल्प बांधणीसाठी लागणाऱ्या कच्या मालासाठी स्थानिक बाजारपेठेची मदत घेणे.

या अशा महत्वाच्या उपायांमधून पर्यावरणाची मोठी हानी टाळण्याचा प्रयत्न महामंडळाने केला आहे.

महामार्गाची प्रभावी आखणी करण्यासाठी सॅटेलाईटसने टिपलेल्या छायाचित्रांची मदत घेण्यात आली. यानंतर प्रत्यक्ष जमिनीवरून संबंधित संपूर्ण मार्गाची पाहणी तज्ज्ञांमार्फत करण्यात आली. यानंतर हा महामार्ग बांधण्यासाठी कुठले पर्यायी मार्ग सर्वच दृष्टीने फायदेशीर ठरतील याबाबत विचारविनिमय झाला.

महामार्गाच्या पॅकेज २ अर्थात अमरावती ते बुलडाणा यादरम्यानच्या आरेखनात तज्ज्ञांच्या एक महत्वपूर्ण गोष्ट लक्षात आली आणि ती अशी की, अमरावती आणि वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या काटेपूर्णा अभयारण्यातून महामार्गाचा काही भाग जातो. ही बाब लक्षात येताच काटेपूर्णा अभयारण्याची समृद्धी प्रकल्पामुळे होणारी हानी टाळण्यासाठी महामार्गाचे आरेखन काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्यातून न नेता बाहेरून रस्त्याची आखणी करण्यात आली. वन्यजीव विभाग ( वन विभाग ) महाराष्ट्र राज्य, अकोला यांच्या मार्गदर्शनानुसार वन्यजीवांच्या जाण्या-येण्यामध्ये बाधा येऊ नये म्हणून wildlife underpass (वाईल्ड लाईफ अंडरपास) यांचे प्रयोजन आखणीमध्ये करण्यात आलेले आहे. चर्चेअंती पर्यावरणातील बाबींचा अभ्यास करून नव्याने ठरवण्यात आले.

अशाप्रकारे विविध ठिकाणी प्रत्येक पॅकेजमध्ये महामंडळाने पर्यावरणाचा विचार करून काही महत्वपूर्ण निर्णय समृद्धी महामार्गच्या आरेखनासंदर्भात घेतले आणि त्यानंतर सर्वानुमते आरेखन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. महामंडळाने या प्रकल्पाच्या आखणीदरम्यान हे दाखवून दिले की पर्यावरणीय संस्थांचा तोल मानवी प्रगतीमुळे ढासळू नये यासाठी महामंडळ कायमच प्रयत्नशील आहे आणि यापुढेही राहील.

 

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकीच्या आधारे राज्यातल्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणार आहे.

प्रकल्पाविषयी

संपर्कासाठी

 • महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित
  नेपिअन सी रोड, प्रियदर्शिनी पार्क,
  मुंबई ४०० ०३६, महाराष्ट्र.
 • ९१ २२ २३६८५९०९,
  ९१ २२ २६५१७९००,
  फॅक्स : ९१ २२ २६४१७८९३.
 • info@msrdc.org