नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम मिशन मोडमध्ये

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम मिशन मोडमध्ये

महिन्याभरात जमिनींची देकार प्रक्रिया पूर्ण होणार

सा. बां. मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

कामाला आणखी गती देण्याचे आदेश

नागपूर/मुंबई, ९ डिसेंबर, २०१६ – महाराष्ट्राच्या अर्थकारणाचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाने आता चांगलाच वेग पकडला असून प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी आवश्यक असलेल्या 60 ते 80 टक्के जमिनीची देकार प्रक्रिया पुढील महिन्याभरात पूर्ण होईल. त्यामुळे या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होईल, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे सांगितले.

श्री. शिंदे यांनी नागपूर येथे या प्रकल्पाची आढावा बैठक घेतली. बैठकीला राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, सह व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर, पी. एस. मंडपे, मुख्य अभियंते दिलिप साळुंके, एस. के. चटर्जी, यू. पी. देबडवार, महामंडळाचे अन्य वरिष्ठ अधिकारी तसेच विविध प्रकल्प सल्लागार कंपन्यांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

श्री. शिंदे यांनी प्रकल्पाचा आढावा घेऊन प्रकल्पाच्या कामाला आणखी गती देण्याचे निर्देश दिले. या संपूर्ण प्रकल्पाचे महसुली विभागानुसार पाच भाग पाडण्यात आले असून प्रत्येक विभागातील प्रगतीचा सविस्तर आढावा श्री. शिंदे यांनी घेतला. सर्व ठिकाणचे व्यवहार्यता अहवाल तयार झाले असून येत्या महिन्याभरात सविस्तर प्रकल्प अहवाल तयार होतील. आजवर प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनींपैकी एकूण 25 टक्के जमिनीबाबत जमीन मालकांचा देकार प्राप्त झाला असून येत्या महिन्याभरात प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले 60 ते 80 टक्के देकार प्राप्त होतील. तसेच, पर्यावरणासह अन्य सर्व परवानग्या देखील मे 2017 पर्यंत प्राप्त होतील.

प्रकल्पाच्या आजवर झालेल्या कामांबाबत श्री. शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. प्रकल्पाचे छोटे छोटे टप्पे करून एकाच वेळी सर्व कामांना सुरुवात करण्याचे निर्देशही श्री. शिंदे यांनी यावेळी दिले. एकूण 715 किमीचा हा समृद्धी महामार्ग असून 2019 पर्यंत तो पूर्ण करण्याचे उद्दिष्ट शासनाने आखले आहे. या महामार्गालगत २४ ठिकाणी कृषी समृद्धी केंद्रे वसवण्यात येणार असून त्या ठिकाणी विविध कृषी पूरक उद्योग उभारण्यात येणार आहेत. तसेच, लँड पुलिंग मॉडेलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विकासात भागिदार करण्यात येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या फायद्याचा ठरणार असून महाराष्ट्राच्या अर्थकारणाचा चेहरामोहरा बदलेल, असा विश्वास श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.

Maharashtra Samruddhi Mahamarg

Maharashtra Samruddhi Mahamarg aims at providing an impetus to the overall development of rural areas by attracting domestic and foreign investments.

About Project

Get in touch

 • Maharashtra State Road Development Corporation Ltd
  Napean Sea Road, Priyadarshini Park,
  Mumbai 400 036, Maharashtra, India.
 • 91 22 23685909,
  91 22 26517900,
  Fax: 91 22 26417893.
 • info@msrdc.org