ग्रामीण वाहतुकीला समृद्धीचे पाठबळ

महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून एकीकडे जसे सुरक्षित आणि वेगवान प्रवासाचे ध्येय साध्य करण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे तसेच या महामार्गाद्वारे नजीकच्या ग्रामीण भागाला विकास प्रक्रियेत सामील करून घेण्याचा महामंडळाचा मानस आहे. महामार्गाच्या नजीक असलेल्या गावांचा या निमित्ताने जर विकास घडवून आणायचा असेल तर समृद्धी महामार्ग हा आजूबाजूच्या गावांना जोडला जाणं अत्यंत महत्वाचे आहे. यासोबतच गावागावांमधील वाहतुकीला चालना मिळणे ही तेवढेच गरजेचे आहे. महामार्ग बांधून पूर्ण झाल्यानंतर ही गावागावांमधील वाहतूक सुरळीत चालू राहावी यासाठी काही विशेष उपाययोजना महामंडळातर्फे करण्यात येणार आहेत. यासंबंधित माहितीचा आढावा घेण्याचा केलेला एक प्रयत्न..

प्रस्तावित महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा राज्यातील १० जिल्ह्यातून जाणार आहे. या १० जिल्ह्यांमधील एकूण ३९० हून अधिक गावांना याचा थेट फायदा मिळणार आहे. असे असले तरी गावागावांमधील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी योग्य व आवश्यक ठिकाणी सर्व्हिस रोड, व्हेईकल अंडर आणि ओव्हर पास, जनावरांसाठीचा विशेष मार्ग यासारख्या सुविधा संबंधित गावातील ग्रामस्थांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. १२० मीटरच्या आर.ओ. डब्ल्यू मध्येच या सर्व सोयी समाविष्ट केलेल्या असतील.

सर्व्हिस रोडच्या माध्यमातून अंडर पास, ओव्हर पास जोडून रस्त्यापलीकडे वसलेल्या गावासोबतचा संपर्क अधिक दृढ करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. योग्य आणि आवश्यक ठिकाणी व महामार्गाच्या दोन्ही बाजूस हे सर्व्हिस रोड बांधण्यात येतील. या सर्व्हिस रोडची रुंदी सुमारे प्रत्येकी ७ मीटर एवढी असणार असून दुतर्फा वाहतूक यामुळे सहज शक्य होऊ शकेल.

व्हेईकल अंडर आणि ओव्हर पास तसेच जनावरांच्या ये जा करण्यासाठी बांधण्यात येणारे अंडर पास हे सुद्धा ग्रामीण वाहतुकीत आपली महत्वाची भूमिका बजावणार आहेत. पादचाऱ्यांसाठीही विशेष अंडरपास ची सुविधा यादरम्यान उपलब्ध करून दिली जाणार आहे. पादचाऱ्यांसाठी बांधण्यात येणारे अंडर पास हे ५.५० मीटर उंच असतील तर रुंदीला १२ मीटर असतील. जनावरांच्या ये जा करण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या अंडर पासचा विचार केला तर ते ३.५० मीटर उंचीचे आणि १०.५० मीटर रुंदीचे बांधण्यात येतील.

काही ठिकाणी या दोन प्रकारच्या अंडर पासचे डिझाईन एकत्र करून एकच अंडर पास बांधण्यात येईल ज्यांची उंची ३ मीटर असून रुंदी ७ मीटर असेल. व्हेईकल अंडर आणि ओव्हर पास संबंधित सुद्धा दुहेरी वाहतूक शक्य होऊ शकेल असे बांधकाम केले जाणे अपेक्षित आहे.

या सर्व सोयी सुविधांमुळे ग्रामीण वाहतुकीला चालना मिळून ग्रामीण भाग इतर नजीकच्या गावांशी आणि समृद्धी महामार्गामुळे शहरी भागाशी वेगाने जोडला जाणार आहे. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्यासोबत ग्रामीण भागातील लोकांचे राहणीमान ही उंचावले जाणार आहे.

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकीच्या आधारे राज्यातल्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणार आहे.

प्रकल्पाविषयी

संपर्कासाठी

 • महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित
  नेपिअन सी रोड, प्रियदर्शिनी पार्क,
  मुंबई ४०० ०३६, महाराष्ट्र.
 • ९१ २२ २३६८५९०९,
  ९१ २२ २६५१७९००,
  फॅक्स : ९१ २२ २६४१७८९३.
 • info@msrdc.org