'एक स्वाक्षरी समृद्धीसाठी'

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पात आरेखन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मोजणी प्रक्रिया राबवली गेली. याद्वारे ज्या जमिनी या प्रकल्पाच्या उपयोगात आणल्या जाणार आहेत त्यांची योग्य मोजणी करून मूल्यांकन करण्यात आले. यानंतर जुलै महिन्यापासून मोजणी प्रक्रिया पूर्ण झालेल्या जमिनींची खरेदी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या खरेदी प्रक्रियेतील विविध टप्प्यांचा उहापोह 'एक स्वाक्षरी समृद्धीसाठी' या ब्लॉगमधून करण्याचा केलेला हा एक प्रयत्न..

राज्यातील जनतेची गरज ओळखून मुंबई आणि नागपूरला जोडणारा नवा महामार्ग 'समृद्धी' नावाने बांधण्याचे प्रशासकीय पातळीवर ठरल्यानंतर महामंडळातर्फे अत्याधुनिक तंत्रप्रणालींचा उपयोग करून आरेखन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. आरेखन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ज्या गावातून हा प्रस्तावित महामार्ग जातो अशा ग्रामस्थांना जमीन मोजणी प्रक्रियेसाठी पाचारण करण्यात आले. मोजणी प्रक्रियेअंती कोणाची किती जमीन जाणार आहे याबद्दल सुस्पष्टता आली. मोजणीनंतर प्रत्यक्ष जमीन खरेदी प्रक्रियेपर्यंत विविध टप्प्यातून हा प्रकल्प मार्ग काढत पुढे चालला आहे.

मोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्वप्रथम नमुना १ आणि नमुना ३ द्वारे प्रकल्पाच्या उपयोगात येणाऱ्या जमिनींचे विवरण तसेच हरकती मागवण्यासंदर्भातील माहिती जनसंपर्क माध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोचवण्यात आली. यानंतर सर्च रिपोर्टच्या माध्यमातून जमिनीसंबंधित विविध गोष्टी प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासल्या जातात. सर्च रिपोर्ट बनवताना खालील बाबी तपासाल्या जाणे अत्यंत आवश्यक असते.

 • वर्तमानकाळातील जमीन मालकाचे नाव
 • ७/१२ चा उतारा ज्याद्वारे जमिनीची सखोल माहिती मिळेल (पिकं आणि स्थावर मालमत्तेच्या विवारणासहीत)
 • जमिनीची १०० वर्षापूर्वीपासूनची वहिवाट (इतिहास) पडताळणे.

जी जमीन या प्रकल्पाच्या उपयोगात आणली जाणार आहे अशा सर्व जमिनींसंदर्भातील वरील सर्व माहिती गोळा करून ते तपासणे याची जबाबदारी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर असते. सर्च रिपोर्टची प्रक्रिया सुरळीत आणि योग्य पद्धतीने पार पडल्यास भविष्यात यासंदर्भात कायदेशीर अडचणी उद्भवत नाहीत.

या संपूर्ण प्रक्रियेमुळे शासनातर्फे दिला जाणारा मोबदला हा योग्य व्यक्तीपर्यंत पोचतो आहे का ? याचीही खात्री करून घेता येते त्यामुळे प्रकल्पात समाविष्ट होणाऱ्या प्रत्येक जमिनीचा सर्च रिपोर्ट तयार करणे हे जेवढे महत्वाचे तेवढेच जिकिरीचे ही आहे.

सर्च रिपोर्ट पूर्ण झाल्यानंतर संबंधित जमीन मालकाने संमतीपत्रावर स्वाक्षरी करून देणे अपेक्षित असते. तसे झाल्यास प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष जमीन खरेदी व्यवहार प्रक्रिया राबवणे सोपे जाते. संमतीपत्रावर स्वाक्षरी करण्यापूर्वी जमीन मालकांच्या किंवा शेतकऱ्यांच्या काही अडचणी असतील किंवा काही शंका असतील तर त्या ही सोडवून प्रक्रिया गतिमान करण्यासाठी विविध स्तरावर प्रशासन प्रयत्न करत असते. प्रकल्पासाठी जमीन देण्यासंदर्भात संबंधित जमीन मालकाकडून संमतीपत्र मिळाल्यानंतर प्रत्यक्ष जमीन खरेदी प्रक्रिया सुरु केली जाते.

वर्तमानातील जमीन मालक, प्रशासकीय अधिकारी यांच्या खरेदी खताच्या कागदपत्रांवर सह्या झाल्यानंतर आर.टी.जी.एस प्रक्रियेद्वारे ठरलेला योग्य मोबदला तात्काळ लाभार्थ्याच्या संबंधित बँक खात्यात जमा केला जातो.

अशा प्रकारे पारदर्शकतेला केंद्रस्थानी ठेऊन विविध टप्प्यातून जमीन खरेदी प्रक्रिया पूर्ण केली जाते. ही खरेदी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच संबंधित जमीन प्रशासन प्रकल्पाच्या उपयोगासाठी वापरू शकते.

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकीच्या आधारे राज्यातल्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणार आहे.

प्रकल्पाविषयी

संपर्कासाठी

 • महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित
  नेपिअन सी रोड, प्रियदर्शिनी पार्क,
  मुंबई ४०० ०३६, महाराष्ट्र.
 • ९१ २२ २३६८५९०९,
  ९१ २२ २६५१७९००,
  फॅक्स : ९१ २२ २६४१७८९३.
 • info@msrdc.org