इंटरचेंज : समृद्धीचा एक दुवा भाग २

इंटरचेंज : समृद्धीचा एक दुवा भाग २
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग ज्या १० जिल्ह्यातून जाणार आहे अशा जिल्ह्यांमधील काही ठराविक व आवश्यक ठिकाणी महामंडळातर्फे इंटरचेंज बांधले जाणार आहेत. या १० जिल्ह्यांमध्ये कुठे, कुठल्या प्रकारचे इंटरचेंज बांधले जातील याची सविस्तर माहिती 'इंटरचेंज : समृद्धीचा एक दुवा' या लेखमालिकेच्या दुसऱ्या व अखेरच्या भागातून आपणापर्यंत पोचवण्याचा आमचा हा एक प्रयत्न...

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा नागपूर आणि मुंबई या राज्यातील दोन मुख्य शहरांना जोडणार आहे. मुंबई आणि नागपूर या दोन शहरांना जोडताना या शहरांमधील ३९० हून अधिक गावांना या महामार्गाचा थेट फायदा पोचणार आहे तर इतर १४ जिल्ह्यांना अप्रत्यक्षपणे या महामार्गाचा फायदा होणार आहे.

समृद्धी महामार्गाची आरेखन प्रक्रिया पूर्ण करताना प्रस्तावित इंटेरचेंजेसचा ही विचार करून १० जिल्ह्यातील कुठल्या ठराविक ठिकाणी इंटरचेंजेस बांधले जाऊ शकतात अशा जागा महामंडळातर्फे निश्चित करण्यात आल्या. पॅकेज १ मधील नागपूर व वर्धा या जिल्ह्यात एकूण ६ इंटरचेंजेस बांधण्याचा प्रस्ताव आहे. पॅकेज २ मधील अमरावती, वाशिम व बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये मिळून एकूण ८ इंटरचेंजेस बांधण्याचे नियोजन आहे. पॅकेज ३ मधील जालना व औरंगाबाद जिल्ह्यात एकूण ६ इंटरचेंजेस प्रस्तावित आहेत तर पॅकेज ४ मधील अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात एकूण ४ इंटरचेंजेस प्रस्तावित आहेत. मुंबईजवळील ठाणे जिल्ह्यातील पॅकेज ५ मध्ये एकूण ६ इंटरचेंजेस नियोजित आहेत. अशा पद्धतीने प्रस्तावित महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर एकूण ३० इंटरचेंजेसचे बांधकाम करण्याचे महामंडळाने नियोजन केले आहे.

सुरवातीला पॅकेज १ मधील नागपूर व वर्धा जिल्ह्याचा विचार केला तर या जिल्ह्यांमध्ये एकूण ६ इंटरचेंजेस प्रस्तावित आहेत. नागपूरमधील पहिला इंटरचेंज हा महामार्गाच्या सुरवातीला शिवमडका येथे बांधण्याचा प्रस्ताव असून हा इंटरचेंज क्लोवरलिफ प्रकारचा असेल. पसरट आणि दुमजली प्रकारात मोडणारा हा इंटरचेंज ३४३ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गाला जोडला जाईल. पॅकेज १ मधील दुसरा, तिसरा आणि चौथा इंटरचेंज डायमंड आकाराचा असून बुटीबोरी एम. आय. डी. सी, सेलडोह- सिंधी रोड व प्रस्तावित कृषी समृद्धी केंद्राजवळ अनुक्रमे बांधण्यात येतील. या ३ इंटरचेंजेसच्या माध्यमातून समृद्धी महामार्ग हा बुटीबोरी एम. आय. डी. सी आणि ३३० क्रमांकाच्या राज्य महामार्गाशी जोडला जाईल. याच पॅकेजमधील ५ वा आणि ६ वा इंटरचेंज हा नियोजनानुसार डबल ट्रम्पेट आकाराचा असेल. हे दोन्ही इंटरचेंजेस वर्धा-आर्वी रोड आणि पुलगाव-आर्वी रोड येथे बांधण्याचे नियोजन असून ते अनुक्रमे २६७ व २९५ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गाशी जोडले जातील.

पॅकेज २ मधील इंटरचेंजेसचा विचार केला तर या पॅकेजमधील आठही इंटरचेंजेस हे डबल ट्रम्पेट आकाराचे असून अनुक्रमे धामणगाव, नांदगाव खांडेश्वर, कारंजा लाड, वनोजा शेलू बाजार, मालेगाव, मेहकर, दुसरबीड व सिंदखेड राजा येथे बांधण्यात येणार आहेत. या पॅकेजमधील इंटरचेंजेसच्या माध्यमातून २३७,६,२१२,१९७,२०४,१७१,१७३,१८३ क्रमांकाचे राज्य महामार्ग जोडले जातील.

पॅकेज २ मधील इंटरचेंजेसचा विचार केला तर या पॅकेजमधील आठही इंटरचेंजेस हे डबल ट्रम्पेट आकाराचे असून अनुक्रमे धामणगाव, नांदगाव खांडेश्वर, कारंजा लाड, वनोजा शेलू बाजार, मालेगाव, मेहकर, दुसरबीड व सिंदखेड राजा येथे बांधण्यात येणार आहेत. या पॅकेजमधील इंटरचेंजेसच्या माध्यमातून २३७,६,२१२,१९७,२०४,१७१,१७३,१८३ क्रमांकाचे राज्य महामार्ग जोडले जातील.

पॅकेज ३ मधील प्रस्तावित ६ इंटरचेंजेससुद्धा डबल ट्रम्पेट आकाराचे असून अनुक्रमे जालना, करमाड, सावंगी, दौलताबाद, लासूर आणि वैजापूर या ठिकाणी इंटरचेंजेसचे बांधकाम नियोजित आहे. या इंटरचेंजेसच्या माध्यमातून २२३ क्रमांकाचा राज्य महामार्ग, करमाडला जोडणारा नवा मार्ग, सावंगी- औरंगाबाद रोड, २११ क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग, वैजापूर- औरंगाबाद आणि वैजापूर-गंगापूर रोड अनुक्रमे समृद्धी महामार्गाशी जोडले जातील.

पॅकेज ४ मधील प्रस्तावित ४ इंटरचेंजेस हे अनुक्रमे डायमंड, क्लोवरलिफ, ट्रम्पेट या आकाराचे असून नगर- मनमाड रोड, नाशिक-पुणे रोड आणि घोटी- भंडारदरा रोड येथे यांचे बांधकाम प्रस्तावित आहे. या पॅकेजमधील इंटरचेंज हे १० क्रमांकाच्या राज्य व ५० क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गाशी जोडले जातील.

ठाणे जिल्ह्यातील पॅकेज ५ मध्ये एकूण ६ इंटरचेंज प्रस्तावित असून तळेगाव, फुगाळे, हिव, रास व चिंचवली येथे प्रस्तावित असलेल्या कृषी समृद्धी केंद्रांजवळ तसेच खुटघर येथे नियोजित इंटरचेंजेस बांधले जाणार आहेत. ज्यांच्या माध्यमातून विविध ग्रामीण भागातील रस्ते आणि ४४ व ७९ क्रमांकाचा राज्य महामार्ग जोडला जाणार आहे.

अशा पद्धतीने पॅकेज १ ते ५ मधील ३० प्रस्तावित इंटरचेंजेस नियोजित ठिकाणी बांधण्यात येणार असून राज्यातील अधिकाधिक जिल्ह्यांना याद्वारे जोडण्याचा प्रत्यत्न महामंडळ करत आहे.

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकीच्या आधारे राज्यातल्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणार आहे.

प्रकल्पाविषयी

संपर्कासाठी

 • महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित
  नेपिअन सी रोड, प्रियदर्शिनी पार्क,
  मुंबई ४०० ०३६, महाराष्ट्र.
 • ९१ २२ २३६८५९०९,
  ९१ २२ २६५१७९००,
  फॅक्स : ९१ २२ २६४१७८९३.
 • info@msrdc.org