इंटरचेंज : समृद्धीचा एक दुवा भाग १

इंटरचेंज : समृद्धीचा एक दुवा भाग १
इंटरचेंज म्हणजे काय ? त्यांची गरज काय ? त्यांचे आकारानुरूप होणारे वर्गीकरण नक्की कसे होते ? कुठल्या मुद्यांचा विचार करून हे इंटरचेंज बांधले जातात ? असे अनेक प्रश्न महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या निमित्ताने समोर येत आहेत. 'इंटरचेंज : समृद्धीचा एक दुवा' या दोन भागातील लेखमालिकेतून आम्ही अशाच प्रश्नांची उत्तरं सोप्या शब्दात देण्याचा प्रयत्न करीत आहोत.

महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर यांना जोडण्यासाठी राज्यात प्रथमच सर्वाधिक लांबीचा पहिला ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्गाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या नावाने हा द्रुतगती मार्ग भविष्यात ओळखला जाईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नागपूर-मुंबई हा प्रवास १३ ऐवजी अवघ्या ८ तासात करणे शक्य होणार आहे. या महामार्गावरून प्रवास करताना गाडीचा वेग कायम ठेऊन प्रवाशांना सुरक्षितपणे प्रवास पूर्ण करता यावा हा या प्रकल्पाचा एक महत्वाचा उद्देश आहे.

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा राज्यातील १० जिल्ह्यातून जाणार आहे. या १० जिल्ह्यात व महामार्गामध्ये प्रवाशांना सुरळीतपणे वाहतूक करता यावी यासाठी आवश्यक ठिकाणी इंटरचेंजेसच्या माध्यमातून एंट्री व एक्झिट पॉईंट्स बांधण्यात येणार आहेत. याच १० जिल्ह्यातील महामार्गानजीक असलेली धार्मिक व पर्यटन स्थळे, औद्योगिक वसाहती, बाजारपेठा याठिकाणी प्रवाशांना सुलभपणे ये-जा करता यावी यासाठी आजूबाजूचे छोटे मोठे रस्ते ही महामार्गाशी जोडावे लागणार आहेत. हे रस्ते मुख्य महामार्गाशी जोडताना महामार्गावरील वाहतुकीला अडथळा होऊ न देता तसेच प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन जोडणे महत्वाचे ठरणार आहे.

हा महामार्ग सहा पदरी असून कमी वेळात जास्त प्रवासी क्षमता असणारा हा महामार्ग ग्रामीण व शहरी भागांना जोडणार आहे. १० जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागाबरोबर नजीकचे राज्य व राष्ट्रीय महामार्ग ही या समृद्धी महामार्गाशी इंटरचेंजच्या माध्यमातून जोडले जाणार आहेत.

इंटरचेंजेसच्या वैशिष्ट्यपूर्ण बांधणीमुळे रस्ता ओलांडताना वाहतुकीला होणारा अडथळा दूर होऊन महामार्गाचा आजूबाजूच्या शहरांशी किंवा गावांशी थेट पण सुरक्षित संपर्क होऊ शकेल. समृद्धी महामार्गाला जिथे जुने राज्य व राष्ट्रीय महामार्ग छेदतात अशा २० हून अधिक ठिकाणी या इंटरचेंजच्या माध्यमातून सुलभ वाहतुकीसाठी व्यवस्था उभी केली जाणार आहे.

महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनांव्यतिरिक्त इतर वाहनांना महामार्गावर यायचे असल्यास किंवा महामार्गावर प्रवास करणाऱ्यांना बाहेर पडायचे असल्यास इंटेरचेंजचा एकमेव सुरक्षित व सुलभ पर्याय प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

इंटरचेंजेसची आखणी करताना आजूबाजूची भौगोलिक परिस्थिती, वाहनांची वर्दळ, प्रवाशांची सुरक्षितता, इंटरचेंजचा भूमितीय आकार, जमिनीची उपलब्धता आणि इतर महत्वाच्या ठिकाणांशी असणारा संपर्क या सर्व मुद्यांचा विचार ही केला जातो. MORTH आणि IRC यांच्या आंतरराष्ट्रीय निकषानुसार या इंटरचेंजेसचे बांधकाम पूर्ण केले जाणार आहे. डायमंड, ट्रम्पेट, डबल ट्रम्पेट आणि क्लोव्हरलिफ हे इंटरचेंजेसचे मुख्य प्रकार आहेत.

महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर जिल्ह्यानुरूप एकूण प्रस्तावित इंटरचेंजेस इतके बांधले जातील..

 • नागपूर आणि वर्धा - ६
 • अमरावती, वाशिम व बुलडाणा - ८
 • जालना आणि औरंगाबाद - ६
 • नगर आणि नाशिक - ४
 • ठाणे - ६

थोडक्यात इंटरचेंज म्हणजे द्रुतगती मार्गावर केलेली अशी वैशिष्ट्यपूर्ण बांधणी ज्याद्वारे महामार्ग हा आजूबाजूच्या शहरी व ग्रामीण भागासोबत नजीकच्या राज्य व राष्ट्रीय महामार्गांशी ही जोडला जातो आणि हे जोडताना महामार्गावरील वाहतुकीला कुठल्याही पद्धतीने अडथळा निर्माण होत नाही.

लेखमालिकेच्या पुढील भागात आपण महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर बांधण्यात येणाऱ्या अशाच एका इंटरचेंजची वैशिष्ट्यपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकीच्या आधारे राज्यातल्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणार आहे.

प्रकल्पाविषयी

संपर्कासाठी

 • महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित
  नेपिअन सी रोड, प्रियदर्शिनी पार्क,
  मुंबई ४०० ०३६, महाराष्ट्र.
 • ९१ २२ २३६८५९०९,
  ९१ २२ २६५१७९००,
  फॅक्स : ९१ २२ २६४१७८९३.
 • info@msrdc.org